आता अमृता फडणवीस- विद्या चव्हाण वाद पेटला

आता अमृता फडणवीस- विद्या चव्हाण वाद पेटला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह ट्विटचे प्रकरण आता माजी मुख्यमंत्री आणि विधान सभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले आहे. अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यात वाद पेटला असून अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. जितेन गजारिया यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवताना विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांना ‘डान्सिंग डॉल’ असे संबोधले होते यावरून हा वाद निर्माण झाला आहे.

अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना पाठवलेली नोटीस ट्वीट केली असून त्यावर विद्या चव्हाण यांना खरमरीत प्रतिक्रियाही दिली आहे. ‘आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण! मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतःला, मगच मिळेल तुला निर्वाण!’ असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

या प्रकरणा संदर्भात अमृता फडणवीस यांनी ‘टीव्ही ९’शी बोलताना विद्या चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणी केली. मात्र, आपण काही चुकीचे बोललो नसल्याचे सांगत विद्या चव्हाण यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.

हे ही वाचा:

महिलेच्या केसात थुंकणाऱ्या जावेद हबीबचा माफीनामा

मिनी लॉकडाऊनचा निर्णय लवकरच

अभिमानास्पद!! वर्षभराच्या आत १५० कोटी लसीकरण

मराठीतून शिक्षण घेतलेल्या १५० उमेदवारांना तात्काळ शिक्षकपदी नियुक्त करा!

जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडी देवींशी केली होती. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी निषेध नोंदवला. या प्रकरणी ‘टीव्ही ९’शी बोलताना त्या म्हणाल्या, हे सर्व प्रकरण पाहून मला मजेदार किस्सा आठवला. भाजपच्या आयटी सेल प्रमुखाने राबडी देवीचे उदाहरण दिले असेल, तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. कारण, ती घरदार आणि चूलमूल सांभाळणारी सांसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचे भाग्य मिळाले. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर नुसती ‘डान्सिंग डॉल’ अशी लोकांची प्रतिमा झाली असती, अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी दिली. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करून नोटीस पाठवली आहे.

Exit mobile version