लखीमपूर खेरी येथील घडलेल्या प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. महाराष्ट्रामधून या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून काही ठिकाणी शिवसेनेने तोडफोड केली, दुकाने बंद करत बंद करण्याची सक्ती केली. या बंदवरून अनेक भाजप नेत्यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीही महाविकास आघाडी सरकारला एक खोचक प्रश्न विचारत टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही या बंदच्या निमित्ताने शरद पवारांना लक्ष्य केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा राजकारणात सक्रीय सहभाग नसला तरी त्या त्यांच्या ट्विट्समुळे आणि त्यांनी गायलेल्या गाण्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्या अनेकदा समाज माध्यमांवरून महाविकास आघाडीवर टीका करताना दिसतात. ‘आज वसुली सुरू आहे की बंद?’ असा खोचक सवाल विचारत अमृता फडणवीसांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
त्यांच्या या खोचक सवालामुळे महाविकास आघाडीचे नेतेही खवळले. त्यांच्याकडूनही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला. गेल्या दीड-दोन वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारवर बरेच आरोप झाले. त्यात सचिन वाझे, परमबीर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरून सरकार चांगलेच अडचणीत आले. सरकारवर वसुली करत असल्याचाही ठपका विरोधकांनी ठेवला. त्याच पार्श्वभूमीवर अमृता यांनी हा जाब विचारला.
Can anyone update me –
आज वसूली चालू है या बंद ?#MaharashtraBandhNahiHai— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 11, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. तसेच आपण हे वक्तव्य केल्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि नातेवाईकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु असल्याचा आरोपही पवारांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या या आरोपाला प्रत्युत्तर दिले. ‘मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का? लखीमपूर घटना निंदनीय आहेच. पण मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला गेला. त्यावेळी त्यांना जालियनवाला बाग आठवला नाही का?’ असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘आजचा बंद आहे हा ढोंगीपणाचा कळस आहे. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का?’ असा प्रश्नही देवेंद्र फडणवीसांनी विचारला आहे.