बेताल बडबडीसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे आता नव्या वादात सापडले आहेत. आपल्याच पक्षाच्या सदस्यांना विकास निधी देत नसल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहेच पण निधी देताना कमिशन मागत असल्याचाही आरोप केला जात आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर मिटकरी यांच्यावर हा आरोप केला आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्याने आढावा घेत असताना जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांना विकास कामांसाठी निधी दिला जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
एकूणच आता कमिशन घेतल्याच्या आरोपावरून मिटकरी चर्चेत आहेत. विरोधकांवर बेलगाम आरोप करण्यासाठी मिटकरी प्रसिद्ध आहेत. खोचक शेरेबाजी करत विरोधकांवर आरोप करणारे आणि आपल्या नेत्यांचे वारेमाप कौतुक करण्यासाठी मिटकरी प्रसिद्ध आहेत. मात्र आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मिटकरी यांची तक्रार केल्यानंतर मिटकरी यांची चांगलीच कोंडी झाली आहे. यासंदर्भातील व्हीडिओ आता व्हायरल होत आहे. याबाबत जयंत पाटील यांनी तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
हे ही वाचा:
लिंक क्लिक करताच ९७ हजार गमावले
मंद घोडा, जुना स्वार; याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे बाराटक्के
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेथे मूर्तिजापूर येथे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली. या आढावा बैठकीत युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य यांनी मिटकरी यांच्या तक्रारी केल्या. अमोल मिटकरी हे निधी देण्यासाठी कमिशन मागत असल्याची प्रमुख तक्रार होती. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात मिटकरी यांचा भाजपा-शिवसेनेच्या आमदारांशी वाद झाला होता. त्यावरून ते चर्चेत आले होते.