लोकसभेच्या १६० कमकुवत जागा जिंकण्यासाठी अमित शहा सरसावले

ज्या मतदारसंघात भाजपा तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर होता, अशा मतदारसंघांवर लक्ष

लोकसभेच्या १६० कमकुवत जागा जिंकण्यासाठी अमित शहा सरसावले

गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांत भाजप तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर होता, अशा मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघांवर लवकरात लवकर उमेदवार जाहीर करण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल. या १६० जागांसाठी रणनिती आखण्यासाठी आणि उमेदवारांच्या नावांवर विचारविनिमय करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १ सप्टेंबरला महत्त्वाची बैठक घेणार आहेत.

सन २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसह सर्व विरोधी पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ गटाच्या बैठकांवर बैठका होत असताना भाजपने सर्व मतदारसंघांचा कसून अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

आव्हाडांनी तेलगी प्रकरणातील अदृश्य हात उघड केला; नंतर पोस्ट डीलीट केली

रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेचे महत्त्व

‘कलम ‘३५ अ’ ने जम्मू-काश्मीरच्या लोकांचे मूलभूत अधिकार काढून घेतले’

‘इस्रो किंवा इन्कोस्पार संस्थांच्या निर्मितीत नेहरूंचा सहभागच नव्हता!’

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीपासूनच भाजप या कमकुवत मतदारसंघांचा अभ्यास करतो आहे. त्यामुळे कमकुवत मतदारसंघांवर लवकरात लवकर उमेदवार घोषित करण्यासह ज्या ४० मतदारसंघांवर विरोधी पक्षाचे दिग्गज उमेदवार उभे राहतात, त्या मतदारसंघांचे उमेदवारही निश्चित केले जाणार आहेत. या ४० मतदारसंघांचा समावेशही या कमकुवत मतदारसंघांमध्ये करण्यात आला आहे. या मतदारसंघांचा समावेश ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीमध्ये करण्यात आला आहे.

ज्या मतदारसंघांत दिग्गज उमेदवार उभे आहेत, त्या जागांवर या दिग्गज नेत्याला अडचणीत आणू शकणाऱ्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे सर्व समीकरण जुळू शकणाऱ्या उमेदवाराला मैदानात उतरवले जाऊ शकते. तसेच, विरोधी पक्षनेत्याला कोंडीत पकडण्यासाठी विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींना मैदानात उतरवले जाऊ शकते. कमकुवत जागांवर निवडणूक लढवण्याची रणनिती गेल्या वर्षीपासूनच आखली जात आहे. त्यानुसार, ४८ मतदारसंघाचे उमेदवार निश्चितही झाले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. १ सप्टेंबरला अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत उर्वरित उमेदवारांच्या नावांवर चर्चा होईल.

Exit mobile version