अमित शहांनी अखिलेश यांच्या फुलटॉसवर लगावला हास्यषटकार

वक्फ विधेयक चर्चेदरम्यान भाजपावर टीका करण्याचा केला होता प्रयत्न

अमित शहांनी अखिलेश यांच्या फुलटॉसवर लगावला हास्यषटकार

बुधवारी लोकसभेत वक्फ विधेयकावर रंगलेल्या चर्चेदरम्यान समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात भाजपच्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीवरून हलक्या फुलक्या शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या. वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असली तरी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपाला अजून राष्ट्रीय अध्यक्ष का मिळाला नाही, यावरून टोला लगावला. त्यावर गृहमंत्री अमित शहांनी हलक्याफुलक्या शब्दात त्याला प्रत्युत्तर दिले.

लोकसभेत बोलताना, अखिलेश यादव यांनी विषयांतर करत असा टोला लगावला की, “जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणवणाऱ्या पक्षाला अजूनही स्वतःचा अध्यक्ष निवडता आलेला नाही. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी बाकांवरून हशा पिकला, तर अमित शहा स्वतःही हसू आवरत बोलायला उभे राहिले.

अमित शहा म्हणाले की, अखिलेशजींनी हसत टिप्पणी केली आहे, त्यामुळे मीही हसत उत्तर देईन. या सभागृहात समोर बसलेले पक्ष पहा. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष नेहमी कुटुंबातील पाच जणांपैकीच निवडले जातात. मात्र, आमच्या पक्षात १२-१३ कोटी सदस्यांचा समावेश असलेली प्रक्रिया पार पडते, त्यामुळे वेळ लागतोच.

यानंतर, मिश्कील अंदाजात त्यांनी अखिलेश यादव यांना उद्देशून म्हटले, “तुमच्याकडे मात्र वेळ लागत नाही. मी सांगतो की तुम्ही २५ वर्षे अध्यक्ष राहाल!

हे ही वाचा:

काँग्रेस काळात समिती फक्त शिक्का मारायची

‘आतापर्यंत वक्फ विधेयकात जे बदल झाले, ते मौलवींच्या दबावामुळे!’

संरक्षण क्षेत्रातील भारताची निर्यात किती वाढली बघा…

कुणाल कामरा येतच नाही! मुंबई पोलिसांचे तिसरे समन्स

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर जे. पी. नड्डा यांना नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यानंतरच्या १० महिन्यांपासून भाजपच्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षाची निवड प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

कन्नौजचे खासदार अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालय भेटीवर अप्रत्यक्षपणे टीका केली. “कोणी तरी (मोदी) आपल्या खुर्ची वाचवण्यासाठी ७५ वर्षांची मर्यादा वाढवण्यासाठी यात्रा (RSS मुख्यालय भेट) करत आहे,” असे यादव म्हणाले. अखिलेश हे वक्फ बोर्डावर बोलत नाहीत हे लक्षात आल्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना आठवण करून दिली की, आपण वक्फ विधेयकावर चर्चा करत आहोत.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपुरातील RSS मुख्यालयाला भेट दिली. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच त्यांनी RSS मुख्यालयाला भेट दिली. सप्टेंबर २०२५ मध्ये मोदी ७५ वर्षांचे होणार असल्याने त्यांच्या राजकीय भविष्यासंदर्भात चर्चांना उधाण आले आहे.

Exit mobile version