अविश्वास ठरावावर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अमित शहा यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी प्रारंभी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामांचा वेध घेत आपल्या सरकारवर विरोधकांचा अविश्वास असला तरी जनतेचा पूर्ण विश्वास आहे हे ठासून सांगितले.
अमित शहा यांनी विरोधकांना प्रारंभी सवाल विचारला की, लोकसभेत आतापर्यंत २७ वेळा अविश्वास ठराव आणला गेला तर ११ वेळा विश्वासदर्शक ठराव. सरकारचे बहुमत डळमळीत असेल तर तो अविश्वास ठराव आणला जातो, पण सरकारविरोधात अविश्वास ठराव आणायचा होता तर त्यात सरकारविरोधी मुद्देच नव्हते. त्यामुळे हा प्रस्ताव चुकीची धारणा तयार करण्यासाठी आणण्यात आला. जनतेच्या प्रश्नांचे प्रतिबिंब या अविश्वास ठरावात दिसतच नाही. आज जनतेला सरकारवर विश्वास आहे कारण ६० कोटी गरीबांच्या मनात आशा निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे या गोष्टी मिळाल्या आहेत, असे लोकांना वाटते. देशात आम्ही फिरतो तेव्हा अविश्वासाची झलकही आम्हाला दिसत नाही. स्वातंत्र्यानंतर जर कुणी लोकप्रिय असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. अमित शहा यांनी यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात तयार करण्यात आलेल्या ‘इंडिय़ा’ या गटाला उद्देशून घराणेशाही क्विट इंडिया, भ्रष्टाचार क्विट इंडिया, तुष्टीकरण क्विट इंडिया असा नारा दिला.
म्हणून मणिपूरमधील मुख्यमंत्र्यांना हटवले नाही
त्यानंतर त्यांनी मणिपूरच्या विषयाला हात घालत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांपासून आम्ही अजिबात पळ काढणार नाही. आम्हालाही मणिपूरमध्ये जे घडते आहे त्यामुळे प्रचंड दुःख आहे. पण त्याचे राजकारण होऊ नये असे आम्हाला वाटते. तिथे राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी विरोधक करत आहेत पण मुख्यमंत्री जर सहकार्य करत नसतील तर राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह हे आम्हाला संपूर्ण सहकार्य करत होते, त्यामुळे तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. आम्ही तेथील डीजीपीला हटवले आहे. तो निर्णय त्यांनी मान्य केला.
अमित शहांनी सांगितले की, ४ मे रोजीचा व्हीडिओ संसद अधिवेशनाच्या एक दिवस आधी आला. तो सोशल मीडियावर का टाकण्यात आला. तो पोलिसांकडे द्यायला हवा होता. पण मणिपूरमधील कुकी आणि मैतेई समाजाच्या लोकांशी माझी चर्चा झालेली आहे. हिंसेने प्रश्न सुटणार नाही. त्यांच्यात अफवांमुळे जो गोंधळ निर्माण झाला आहे तो सोडविण्याचा मी प्रयत्न करत आहे. मात्र या सगळ्यात मणिपूरमधईल हिंसाचार आम्ही कोणत्याही पक्षाशी जोडला नाही.
अमित शहांनी यासंदर्भात मणिपूरचा इतिहासही सांगितला. ते म्हणाले की, सहा वर्षात मणिपूरमध्ये एकदाही कर्फ्यू लागला नाही. एक दिवसही बंद झाला नाही. गेल्या सहा वर्षांपासून भाजपाची सत्ता मणिपूरमध्ये आहे. पण २०२३मध्ये दंगली झाल्या. २०२१मध्ये हे वातावरण बिघडण्यास सुरुवात झाली. ब्रह्मदेशातील म्हणजेच म्यानमारमधील लोकशाही सरकार पडले आणि लष्कर सत्तेवर आले. त्यातून तिथला कुकी समुदाय मणिपूरमध्ये आला. हजारोंच्या संख्येने कुकी समुदायाचे लोक इथे आल्यामुळे मणिपूरमधील लोकांमध्ये एक असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले.
हे ही वाचा:
‘माझी माती माझा देश’मधून स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता
वनडे वर्ल्डकपच्या ८ सामन्यांचे वेळापत्रक बदलले
काश्मीर खोऱ्यात अवतरला परदेशी पर्यटकांचा ‘स्वर्ग’
चांद्रयान- ३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत; १७४ किमी x १४३७ किमी अंतराच्या कक्षेत प्रदक्षिणा
अमित शहा म्हणाले की, हे निर्वासित जंगलात राहू लागले. त्यातून येथील लोकांमध्ये एक असुरक्षिततेची भावना तयार झाली. डोंगरांवर राहणारे कुकी आणि खाली राहणारे मैतेई समाजाचे लोक यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. त्यातच मैतेई समाजाला आदिवासींचा दर्जा दिल्यामुळे या संघर्षाला बळ मिळाले. परिणामी. यावर्षी हा संघर्ष उफाळला. पण म्यानमारमधून येणाऱ्या निर्वासितांना रोखण्यासाठी आम्ही तिथे कुंपण घातले आहे. शरणार्थींची जी वस्ती इथे तयार झाली त्यांच्या या वसाहतीला गाव घोषित करण्यात आल्याची अफवा पसरविण्यात आली. त्यातून स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. शरणार्थींना अधिक संख्येने येता येऊ नये यासाठी १० किमीपर्यंत कुंपण घातलेले आहे. ६० किमीपर्यंत कुंपण घालण्याचे काम सुरू आहे. तर ६०० किमी अद्याप कुंपण नाही. मात्र इथे आलेल्या निर्वासितांच्या अंगठ्याचे ठसे, डोळ्यांचे छायाचित्र आम्ही गोळा केलेले आहे. त्यांना परिचयपत्र दिलेले आहे.
अमित शहांनी विरोधकांना विचारले की, आम्ही तर मणिपूरवर चर्चा करण्यास तयार होतो. एक प्रकारचा संभ्रम देशात निर्माण केला जात आहे. सरकार मणिपूरच्या चर्चेपासून दूर जात आहे, असा प्रचार केला जात आहे. पण तुम्हीच चर्चेला तयार नव्हता. सभागृहात गोंधळ घालून आमचा आवाज बंद कराल असे तुम्हाला वाटत होते. पण तुम्ही असे करू शकत नाही कारण आम्हाला १३० कोटी जनतेने निवडून दिले आहे.