काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या चर्चेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी काँग्रेसवर ताशेरे ओढले. ‘काँग्रेस इतके दिवस नकारात्मक अवस्थेत होती. संपूर्ण निवडणुकीत ते बहुमत मिळवणार असल्याचा प्रचार करत राहिले, पण त्यांना परिस्थिती माहीत आहे की… येत्या एक्झिट पोलमध्ये त्यांचा दारुण पराभव होईल. त्यामुळे ते मीडियाला सामोरे जाऊ शकत नाहीत, म्हणून ते संपूर्ण एक्झिट पोलच्या अभ्यासावर बहिष्कार घालत आहेत,’ असे गृहमंत्र्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
‘बऱ्याच दिवसांपासून एक्झिट पोल होत आहेत, पण यावेळी पराभवामुळे त्यांना कसे स्पष्ट करावे, हेच कळत नाही आणि म्हणूनच ते बहिष्कार टाकत आहेत. राहुल गांधींनी काँग्रेसची धुरा हाती घेतल्यापासून ते नकारात्मक स्थितीत आहेत,’ असेही ते म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी काँग्रेसने दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कोणत्याही लोकसभा एक्झिट पोलच्या चर्चेत भाग न घेण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केल्यानंतर काही तासांनी अमित शहा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा:
इस्रायली कंपनीकडून लोकसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न; भाजपाविरोधी अजेंडा चालवल्याचा आरोप
लोकशाहीच्या उत्सवाचा अंतिम टप्पा; ५७ जागांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद
बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णाला पोलीस कोठडी
बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा भारतात आला; तात्काळ केली अटक
‘काँग्रेस टीआरपीसाठी सट्ट्यामध्ये गुंतू इच्छित नाही. ४ जून रोजी निकाल लागतील. त्यापूर्वी, आम्हाला टीआरपीसाठी सट्ट्यामध्ये गुंतण्याचे कोणतेही कारण दिसत नाही,’ असे त्यांनी ‘एक्स’वर शेअर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एक्झिट पोलवरील वादविवादांमध्ये भाग घेणार नाही. कोणत्याही ‘डिबेट’चा उद्देश लोकांना माहिती देणे हा असावा. आम्ही ४ जूनपासून चर्चेत आनंदाने भाग घेऊ,’ असे खेरा म्हणाले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, टेलिव्हिजन चॅनेल आणि वृत्त आउटलेट १ जून रोजी संध्याकाळी साडेसहानंतर एक्झिट पोल जाहीर करणार आहेत.