बंगालला ‘शोनार बांगला’ बनविण्यासाठी लढाई

बंगालला ‘शोनार बांगला’ बनविण्यासाठी लढाई

येत्या काही महिन्यातच पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात चुरशीची लढाई होणार आहे. या निवडणुकीत विजय प्राप्त करून पश्चिम बंगालमध्ये पहिले भाजपाचे सरकार प्रस्थापित करण्यासाठी भाजपा पूर्ण ताकद लावत आहे.

याचाच एक भाग म्हणून आज कोलकाता येथील सायन्स सिटी ऑडिटोरियम येथे भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. यावेळी त्यांनी ‘ही निवडणुक केवळ सत्ताबदलासाठी नसून बंगालला पुन्हा एकदा शोनार बांगला बनविण्यासाठी आहे.’ असेही सांगितले.  या निवडणूकीसाठी सोशल मिडिया वॉरियर्सना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकींसाठी मोदीपारा या मोबाईल ऍपचे अनावरण केले. ही निवडणूक जिंकण्यासाठी चार टीमची रचना करण्यास त्यांनी सुचवले. त्यातून रणनिती आखून सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी मोदीपारा ऍपचे मोठे साहाय्य होणार असल्याची ग्वाही देखील दिली. आपण केलेले काम लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून प्रतिसाद काय मिळतो त्यावरही लक्ष ठेवण्यास सांगितले.

दीदीच्या राज्यात कम्युनिस्टही चांगले वाटू लागले

या भाषणात गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही टिका केली. स्वातंत्र्यानंतर एकेकाळी आघाडीवर असणारा बंगाल आधी काँग्रेस मग कम्युनिस्ट आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेस यांच्या काळात पिछाडीवर गेला असे ते म्हणाले. ममता बॅनर्जी यांची राजवट म्हणजे एकवेळ कम्युनिस्ट परवडले इतकी वाईट असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ‘दुर्गा पूजन, राम नवमी आणि वसंत पंचमीला सरस्वती पूजन करण्याचा अधिकार नसेल तर स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. दुर्गा विसर्जन बंगालमध्ये नाही होणार तर काय पाकिस्तानात होणार?’ असा संतप्त सवालही त्यांनी केला. ‘बंगालमधील इश्वरचंद्र विद्यासागर आणि रविंद्रनाथ टागोर यांनी जोपसलेली सरस्वती पूजनाची परंपरादेखील दीदीच्या मतपेटीच्या राजकारणामुळे बंद झाली.’ असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला. बंगालमधल्या विजयासाठी धार्मिक, सांस्कृतिक चेतना जागविण्याची गरज यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी बंगालमध्ये २०० पेक्षा अधिक जागा जिंकून भाजपा सत्तेत येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बंगाल जिंकल्यानंतर आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा आणि केरळ अशी विजयाची मालिकाच सुरू होईल असा दृढ विश्वासही त्यांनी व्यक्त केला

Exit mobile version