केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाह गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील इंदिरा मैदान येथे आपल्या पक्षाच्या ‘पॉरीबर्तन यात्रे’ च्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याच्या शुभारंभासाठी दाखल झाले. पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या राजकीय दौर्यावर असलेले शाह आज सकाळी साडेअकरा वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले.
दक्षिण २४ परगण्यातील गंगासागर येथे आल्यानंतर अमित शाह, कपिल मुनी आश्रमात तेथे प्रार्थना करण्यासाठी गेले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या सरकारला काढून टाकण्याचा निर्धार करत त्यांनी यात्रा सुरु केली.
हे ही वाचा:
‘जय श्रीराम’च्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि तृणमूल आमने सामने
रॅलीला संबोधित करताना शाह म्हणाले, “बंगालला ‘सोनार बांगला’ बनवण्याचा हा भाजपाचा लढा आहे. ही लढाई आमच्या बूथ कामगार आणि टीएमसीच्या सिंडिकेटमध्ये आहे. ममता बॅनर्जींचे सरकार घालवून भाजपाचे सरकार आणणे हे आपले उद्दिष्ट नाही. पश्चिम बंगालच्या परिस्थितीत बदल होईल, राज्यातील गरिबांच्या परिस्थितीत बदल होईल,पश्चिम बंगालच्या महिलांच्या परिस्थितीत बदल होईल हे सुनिश्चित करणे हे आपले ध्येय आहे. पश्चिम बंगालमधील महिलांना भाजप सरकार ३३ टक्क्यांहून अधिक आरक्षण देईल.” असेही गृहमंत्र्यांनी जाहीर केले.
Flagging off @BJP4Bengal’s fifth Poribortan Yatra from Kakdwip, West Bengal. Watch my address live! https://t.co/RGUx9T3K97
— Amit Shah (@AmitShah) February 18, 2021
“दुर्गापूजन पश्चिम बंगालमध्ये होऊ नये का? त्यासाठी कोर्टाची परवानगी घेण्याची गरज आहे का? सरस्वती पूजा होऊ नये का? ममता बॅनर्जीं भाजपाच्या दबावानंतरच सरस्वतीची उपासना करताना दिसल्या. दीदी, बंगालच्या जनतेला माहिती आहे की तुम्हीच शाळांमध्ये “सरस्वती पूजन” थांबवले होते.” असा हल्ला अमित शहांनी केला.