केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचं ढळढळीत खोटं बोलत असल्याचेही शाह यांनी सांगितले. “मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो.” असेही शाह म्हणाले.सिंधुदुर्गमधील लाईफटाईम महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
“मी आज महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायला आलोय की तुम्ही जो जनादेश दिला होता, त्या पवित्र जनादेशाचा अपमान करण्यात आला. एक अपवित्र आघाडी करुन सत्तेच्या लालसेपोटी इथे सरकार स्थापन झाले आहे. जनादेश नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन करण्याचा होता.” असे अमित शाह यांनी सांगितले. “आम्ही वचन तोडलं नाही. आम्ही वचन पाळणारे लोक आहोत. आम्ही असं ढळढळीत खोटं बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार यांच्या कमी जागा येऊनही ठरल्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. नितीश कुमार यांनी भाजपचा मुख्यमंत्री करा असं म्हटलं होतं तरी आम्ही शब्द पाळला. आज नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत.” असे उदाहरणही शाह यांनी दिले.
“मी जनतेत राहणारा व्यक्ती आहे. मी कधीही घाबरत नाही. जे होतं ते मी सर्वांसमोर बोलतो. त्यांना असं कोणतंही वचन दिलं नव्हतं, हेच सांगायला मी इथे आलोय,” असेही अमित शाह म्हणाले.
“जर असं मानलं की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं, तर मग शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या बॅनरवर तुमच्यापेक्षा दुप्पट मोठा फोटो नरेंद्र मोदींचा का लागत होता? मोदींचा फोटो वापरुन निवडणूक लढली. माझ्यासोबत आणि मोदींसोबत तुमची रॅली झाली. प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हटलं की एनडीएचं सरकार बनवा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. त्यावेळी उद्धव ठाकरे का बोलले नाही? असं कोणतंच बोलणं झालं नव्हतं. सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरेंच्या सर्व मुल्यांना तापी नदीत विसर्जित करुन उद्धव ठाकरे सत्तेवर बसलेत.” असा हल्लाबोल अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर केला.