पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान शनिवार, १७ एप्रिल रोजी पार पडले. कोरोनाच्या सावटात पार पडलेल्या या निवडणुकीच्या मतदानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून अंदाजे ६६.१५% मतदान झाले आहे. एकूण १९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षात प्रमुख लढत होती.
एकीकडे महाराष्ट्र कोविडच्या विळख्यात अडकलेला असताना पंढरपुरात मात्र गेल्या काही दिवसांपासून राजकीय रणकंदन सुरु आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने येथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समोरासमोर ठाकले. राज्यातील बड्या नेत्यांच्या सभांनी हा परिसर दणाणून गेला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील अशा दोन्ही पक्षांच्या अनेक बड्या नेत्यांच्या राजकीय सभांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्या पावसात भिजत झालेल्या सभांची तर खूपच चर्चा झाली.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारची रेमडेसिवीरच्या किंमतीसाठी घासाघीस
मुख्यमंत्र्यांनी ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ म्हणत कर्तव्यपूर्ती करावी
कोरोना लसीवर असलेली बौद्धिक संपदेची कलमे शिथिल करा
बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली. यासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपाकडून समाधान औताडे यांना रिंगणात उतरवण्यात आले. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आत्यानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल हा ठाकरे सरकारच्या कारभाराचे लोकांकडून झालेले मूल्यमापन असणार आहे.
१७ एप्रिलच्या दिवशी झालेल्या मतदानाला सुरवातीला थोडा मंद होता. पण दुपारनंतर यात वाढ झालेली दिसली. संध्याकाळी तर आणखीन उत्साहात मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे २ मे रोजी कळणार आहे.