अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबावर पुन्हा एकदा सरकार पुरस्कृत दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा ठपका ठेवत काळ्या यादीत ढकलले आहे. यामुळे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या क्युबासोबतचे संबंध सुधारण्याच्या मनसुब्यांत खोडा घातला गेला आहे.
अशा प्रकारे काळ्या यादीत टाकले गेल्याचा मोठा नकारात्मक परिणाम त्या देशाच्या थेट विदेशी गुंतवणुकीवर होतो. हा ठपका जर काढायचा असेल तर नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या परवानगी नंतरच हे शक्य आहे. यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. त्यामुळे क्युबावर काही महिने तरी काळ्या यादीत राहणार अशी चिन्हे दिसत आहेत.
अमेरिकेच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळाचे केवळ नऊ दिवस उरलेले असताना परराष्ट्र सचिव माईक पॉम्पेओ यांनी क्युबाचे कोलंबियाच्या बंडखोरांशी राजकीय संबंध, व्हेनेझुएलातिल अति-डाव्या उठावखोरांशी असलेले संबंध अमेरिकेतील अनेक फरारींना दिलेला आश्रय विषद करून, क्युबाला काळ्या यादीत टाकण्याच्या कृतीचे समर्थन केले.
“या कृतीने आम्ही पुन्हा एकदा क्युबाच्या सरकारला जबाबदार धरणार आहोत आणि ‘कॅस्ट्रो सरकारने आंतरराष्ट्रीय दहशतवादाला असलेला पाठिंबा तात्काळ काढून घ्यावा आणि न्यायातील अडथळे करावेत’ असा स्पष्ट संदेश देणार आहोत.” असे विधान पॉम्पेओ यांनी केले. त्याबरोबरच “लोकशाहीवादी राज्य, मानवाधीकार, धर्मस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्या प्रतिक्षेत असलेल्या क्युबन नागरिकांच्या पाठिशी युनायटेड स्टेट्स उभे आहे.” असे देखील पॉम्पेओ यांनी म्हटले आहे.
बराक ओबामा यांनी क्युबासोबतचे संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून २०१५ मध्ये त्यांच्या कार्यकाळात क्युबाचे काळ्या यादीतील नाव काढून घेतले होता.