कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबच्या पुढच्या मुख्यमंत्री कोण होणार त्याची चर्चा सुरू झाली असून लवकरच त्यावर पडदा पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. अंबिका सोनी या सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीय मानल्या जात असून त्यांच्याकडे पंजाबची मदार सोपवण्याची सोनिया यांची इच्छा असल्याचे म्हटले जात आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवार १८ सप्टेंबर रोजी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे पंजाबच्या राजकारणात पेच निर्माण झाला आहे. पंजाबची निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच एवढी वर्षे यशस्वीपणे काम करणारे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेणे हे सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने मोठे अडचणीचे ठरणार असल्याचे मानले जात आहे.
काँग्रेसला या पेचप्रसंगातून बाहेर काढण्यासाठी अंबिका सोनी यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अंबिका सोनी या आज चंदिगड साठी रवाना झाल्या असून थोड्याच वेळात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
हे ही वाचा:
चीनला इशारा देणारा ‘ऑकस’ सैन्य करार आहे तरी काय?
‘उद्धवजी, अनैसर्गिक आघाडी केल्याचे आता लक्षात येत असेल ना?’
मोदींचा चेहरा आणि शिवसेनेतील फाटके मुखवटे
कोण आहेत अंबिका सोनी?
अंबिका सोनी या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून गांधी कुटुंबाशी त्यांची वर्षानुवर्षाची कौटुंबिक मैत्री आहे. १९६९ साली त्यांना स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी पक्षात आणले. फाळणीच्या वेळी त्यांचे वडील अमृतसरचे जिल्हाधिकारी असून त्यांनी जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत एकत्र काम केले आहे. सोनी यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले असून गेली अनेक वर्षे त्या सातत्याने राज्यसभा सदस्य राहिल्या आहेत. तर त्यांनी भारताच्या पर्यटनमंत्री तसेच माहिती आणि दूरसंचार मंत्री म्हणून काम पाहिले आहे.