पदाधिकाऱ्यांना आघाडीच्या बैठकांना जाण्यास आंबेडकरांकडून मनाई; राऊतांकडून सावरासावर

'वंचितची मविआसोबत अजून युती पूर्ण नाही'

पदाधिकाऱ्यांना आघाडीच्या बैठकांना जाण्यास आंबेडकरांकडून मनाई; राऊतांकडून सावरासावर

लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असताना अद्याप महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीच्या ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपावर चर्चा चालूच आहे. दरम्यान, त्यांच्यातील बिघाडी आता चव्हाट्यावर येत असल्याच्या चर्चा आहेत. एकीकडे ही जागावाटपाची चर्चा चालू असल्याचे सांगत असताना वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी वेगळीचं भूमिका घेतली आहे.

मविआसोबत आपली पूर्णपणे युती झालेली नाही. त्यामुळे राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मविआने बोलावलेल्या बैठकींना जाऊ नये, असा आदेश प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे अद्याप महाविकास आघाडीत सर्व आलबेल नसल्याच्या चर्चांना जोर आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, “आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना इकडे जाऊ नका आणि तिकडे जाऊ नका असे सांगावे लागत नाही. आंबेडकरी जनतेची एक भूमिका आहे. या वेळी प्रकाश आंबेडकरांनी हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीसोबत जायला हवं,” असा सल्ला संजय राऊत यांनी आंबेडकर यांना दिला आहे.

“बाळासाहेब आंबेडकर हे राज्यात जिथे जातील तिथे संविधान रक्षणाची भूमिका मांडत आहेत. लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राहुल गांधी, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांनी देशात परिवर्तन घडवून आणण्याचं ठरवलं आहे. हे परिवर्तन घडून न आल्यास देशात खऱ्या अर्थाने हुकूमशाहीला सुरुवात होईल. प्रकाश आंबेडकर यांचीदेखील हीच भूमिका आहे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.

हे ही वाचा:

जरांगे पुन्हा फडणवीसांवर घसरले!

भारतीय नौदलाचा खलाशी बेपत्ता, शोध मोहीम सुरु!

दिल्लीतील बदरपूरमध्ये कारचे नियंत्रण सुटून ट्रकला धडक, तीन जणांचा मृत्यू!

तीन मिनिटात ब्राह्मणांना संपवतो म्हणणारा अटकेत

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. “वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाही. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये.”

Exit mobile version