जय भवानी, जय शिवाजी बोलायचे आणि मतं मिळवायची ते दिवस आता गेले. जुना काळ गेला, असे खळबळजनक वक्तव्य उबाठाचे विधान परिषदेचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे. कर्जत येथील मेळाव्यात बोलताना दानवे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे उबाठआ गटाच्या कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
रायगडच्या कर्जत येथे उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दानवे बोलत होते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दानवे हे प्रमुख मार्गदर्शक होते. त्यावेळी त्यांनी उपरोक्त विधान केले. आपल्याकडे १०० टक्के ज्ञान हवे, योग्य माहिती हवी असा आग्रहही त्यांनी कार्यकर्त्यांकडे धरला. मात्र ज्या शिवसेनेच्या मेळाव्यांत, भाषणात जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा नेहमीच दिल्या जातात, त्याबद्दल दानवे यांनी केलेल्या या विधानाचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न अनेकांना पडला.
हे ही वाचा:
ट्रम्प यांनी अमेरिकेची परकीय मदत थांबवली
स्वीडनमध्ये कुराण जाळणाऱ्या मोमिकला घातल्या गोळ्या!
राजधानीत मराठी साहित्य संमेलन ही अभिमानाची गोष्ट!
लग्नात भेट झाली की युती होते, हा भाबडा विचार!
उद्धव ठाकरे यांनी २०१९मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळविली, तेव्हापासून उद्धव ठाकरे यांची भूमिका पूर्णपणे बदलल्याची टीका होऊ लागली. विशेषतः त्यांनी आपल्या भाषणात माझ्या तमाम हिंदू भगिनी आणि बांधवांनो ही घोषणा बंद करून माझ्या तमाम देशभक्त भगिनी आणि बांधवानो अशी नवी घोषणा द्यायला सुरुवात केली, त्यावरूनही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाली.
वक्फ कायद्यात सुधारणा करून नवा कायदा मंजूर करण्याचे प्रयत्न सुरू झालेले असताना वक्फ कायदा कोण बदलतो ते बघू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. त्यावरूनही ठाकरेंची भूमिका बदलल्याची टीका झाली. आता दानवे यांच्या या विधानामुळे उबाठा गटाकडे वेगळ्या नजरेतून पाहिले जाणार आहे. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय घ्यायचा असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.