पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग बुधवारी चंदीगडमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. अमरिंदर सिंग यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये सांगितले. “पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग उद्या (बुधवार, २७ ऑक्टोबर) रोजी सकाळी ११ वाजता चंदीगड येथे पत्रकार परिषदेला संबोधित करतील. हा कार्यक्रम त्यांच्या फेसबुक पेजवर थेट प्रसारित केला जाईल.” असं रवीन ठुकराल यांनी ट्विट केलं आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेतून अमरिंदर सिंग नवीन पक्षाची घोषणा करणार का? आणि या पक्षाची भाजपाशी युती होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
या घडामोडींशी परिचित असलेल्या लोकांनी सांगितले की, अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमधून राजीनामा देण्याची आणि ‘द पंजाब लोक काँग्रेस’ असे नाव दिलेला स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची अपेक्षा आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या भांडणानंतर सिंग यांनी गेल्या महिन्यात पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. माजी मुख्यमंत्र्यांनी नंतर जाहीर केले की ते काँग्रेस सोडणार आहेत आणि पंजाब आणि तेथील लोकांच्या हितासाठी त्यांचा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. शेतकरी विरोध करत असलेले तीन केंद्रीय कृषी कायदे मागे घेतल्यास भारतीय जनता पक्षाशी युती करण्यासही त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. असेही ते म्हणाले.
अमरिंदर सिंग अलीकडेच त्याची पाकिस्तानी मैत्रिण आरोसा आलम यांच्या वादात अडकले होते, उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) शी तिचे संबंध असल्याचा संशय व्यक्त केला होता.
हे ही वाचा:
कोवॅक्सिनला २४ तासात मिळणार डब्ल्यूएचओची मान्यता
भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा
समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?
‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे
राज्य सरकार या प्रकरणाची चौकशी करेल असेही रंधावा म्हणाले. अमरिंदर सिंग यांनी सोमवारी आलमचे अनेक ज्येष्ठ राजकारणी आणि इतर मान्यवरांसोबतचे फोटो प्रसिद्ध केले आणि विरोध करणाऱ्यांना बोलण्यापूर्वी विचार करण्यास सांगितले. सिंह यांचे भाषण पुढील वर्षीच्या सुरुवातीस पंजाबमधील महत्त्वपूर्ण विधानसभा निवडणुकीपूर्वी आले आहे.