महाराष्ट्र विधानसभेचे आमदार देवेंद्र भुयार यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमरावती येथील जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. २०१३ सालच्या एका प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने देवेंद्र भुयार यांना शिक्षा ठोठावली आहे. तीन महिने तुरुंगवास आणि पंधरा हजार रुपये दंड असे या शिक्षेचे स्वरूप असणार आहे.
२०१३ साली अमरावती येथे देवेंद्र भुयार यांनी एक तीव्र आंदोलन केले होते. ज्वारीच्या प्रश्ना संदर्भात भुयार यांनी हे आंदोलन केले होते. तत्कालीन तहसीलदार राम लंके यांच्या विरोधात वरुड येथील तहसील कार्यालयाच्या आवारात हे आंदोलन झाले होते. या आंदोलनादरम्यान तहसीलदार राम लंके यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देवेंद्र भुयार यांच्यावर आला होता. त्यासाठी भुयार यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता न्यायालयाने कलम ३५३ अंतर्गत देवेंद्र भुयार यांना शिक्षा सुनावली आहे.
हे ही वाचा:
मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस
रॉजर फेडररचा टेनिसमधून संन्यास? काय झाले आहे वाचा…
राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे
२०१३ साली तहसीलदार राम लंके हे सुवर्ण जयंती राजस्व अभियानाची यशोगाथा तयार करत असताना देवेंद्र भुयार हे सभागृहात दाखल झाले आणि तावातावाने बोलू लागले. वरुड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सरकारचे ज्वारी खरेदी केंद्र बराच काळ का बंद आहे? असा सवाल भुयार यांनी विचारला तर तहसीलदार राम लंके यांनी आपला फोन उचलला नाही याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला. यावरूनच देवेंद्र भुयार यांनी आक्रमक होत शिवीगाळ केली होती. भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते मोर्शी मतदारसंघातून निवडून आले आहेत.