अमर जवान ज्योती ही आतापर्यंत राजधानी दिल्लीतील इंडिया गेटची ओळख होती. मात्र आज ५० वर्षांनंतर ही ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये विलीन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सन २०१९ मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केले होते. आतापासून राष्ट्रीय युद्ध स्मारकातच ही धगधगती ज्योत प्रज्वलित होणार आहे.
अमर जवान ज्योत म्हणून ओळखली जाणारी चिरंतन ज्योत १९७२ मध्ये इंडिया गेटच्या कमानीखाली १९७१ च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आली होती. या युद्धामध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर बांगलादेशची स्थापना झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २६ जानेवारी १९७२ रोजी या स्मारकाचं उद्घाटन केले होते. इंडिया गेटवर असणाऱ्या अमर जवान ज्योती स्मारकावर शहीद झालेल्या सर्व सैनिकांची नावं आहेत.
दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय युद्ध स्मारक अस्तित्वात आल्यानंतर अमर जवान ज्योतीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कारण, आता देशाच्या शहीद जवानांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक बनवण्यात आले आहे, तर अमर जवान ज्योतीवर वेगळी ज्योत का पेटवली जाते, असा सवाल उपस्थित केला जात होता. अमर जवान ज्योती देशाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग असल्याने ती सुरूच राहील, असे यापूर्वी भारतीय लष्कराने म्हटले होते.
हे ही वाचा:
…म्हणून दापोलीतली शिवसेनेची सत्ता गेली राष्ट्रवादीकडे!
बापरे!! मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर दररोज ११ हजार वाहने टोल देतच नाहीत!
इंडिया गेटवर नेताजींचा भव्य पुतळा….पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
पणजीतून शिवसेनेने उमेदवार दिला पण उत्पल पर्रीकर लढत असतील तर…
मात्र आता पाकिस्तानसोबतच्या १९७१ च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारताने आता ही अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये इंडिया गेट जवळच्या अमर जवान ज्योतीमधील अग्नि राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये तेवत ठेवलेल्या स्मारकापर्यंत आणला जाणार आहे. त्यानंतर इंडिया गेटवरील ज्वाला विझवण्यात येणार असल्याचा दावा केला जात असला तरी ही ज्योती तेवत ठेवली जाणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाआधी लष्करी अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण करणार आहेत.