पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तसेच त्यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेसही भाजपामध्ये विलीन झाला आहे. यापूर्वी त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती.
पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली होती. त्याचवेळी त्यांचे पुत्र रणिंदर सिंग यांनी भाजपाशी समन्वय साधून तिकीट वाटपात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर आता अमरिंदर सिंग यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपाची ताकद आणखी वाढली आहे. अमरिंदर सिंग यांच्या भाजपा प्रवेशावेळी भाजपा नेते सुनील जाखर आणि भाजपा पंजाब अध्यक्ष अश्विनी शर्मा उपस्थित होते. अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणिंदर सिंग आणि मुलगी जय इंदर कौर यांनीदेखील अमरिंदर सिंग यांच्यासोबत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
आमचा विश्वास आहे की देशातील योग्य विचारांच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे. पंजाबसारख्या संवेदनशील राज्याला जपून हाताळले पाहिजे. मुख्यमंत्री असताना, कॅप्टन यांनी कधीही राष्ट्रीय सुरक्षेसमोर राजकारण केले नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही भाजपामध्ये प्रवेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
‘उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मतांचा अपमान केला’
टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळाडू घालणार ‘हर फॅन की जर्सी’
संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला
दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसकडून दोन वेळा पंजाबचे मुख्यमंत्री झाले आहेत. तसेच कॅप्टन अमरिंदर सिंग हे पूर्वीच्या पटियाला राजघराण्याचे वंशज आहेत.