पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरला पुराचा धक्का हा मोठ्या प्रमाणात बसलेला असून, अनेक उद्योगधंदे पूर्णपणे बुडाले आहेत. उद्योगावर ऐन सणासुदीच्या कालावधीत संक्रात आलेली आहे.
महापुरामुळे एकट्या करवीरनगरीत हजार कोटींचा फटका बसलेला आहे. तब्बल १ हजार ५० कोटींचे नुकसान झाल्याचा आकडा आता समोर आलेला आहे. जवळपास महापुरानंतर १५ दिवसांनी नुकसानीचा हा आकडा आता समोर येत आहे. सध्याच्या घडीला अजूनही पंचनामे पूर्ण नाहीत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हा आकडा आणखीन वाढण्याची दाट शक्यता आहे. पूरबाधितांना सानुग्रह अनुदानासाठी आगाऊ मदत म्हणून शासनाकडून १७ कोटी ४२ लाख इतका निधी प्राप्त झाला आहे. परंतु हा निधी अपूर्ण असून, यामुळे पूरग्रस्तांना कुठलीच मदत होऊ शकणार नाही.
जुलैमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात तुफान पावसामुळे शहरात तसेच अनेक गाव खेड्यात महापूराचा फटका बसला होता. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे हजारो उद्योगांवर पाणी पडले. यामुळे शेतकरी वर्गाचेही मोठे नुकसान झाले. शेती वाहून गेल्यामुळे झालेले नुकसान असताना, जवळ असलेले पशुधनही वाहून गेले. त्यामुळेच बळीराजा पुरता हवालदिल झाला होता. सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. यामुळे चारशेपेक्षा अधिक गावात पुराचे पाणी शिरले.
अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. अनेकांची पिके कुजल्यामुळे आता खायचे काय असाच प्रश्न शेतकरी वर्गापुढे पडलेला आहे. कोल्हापूरमध्ये ७१ हजार २८९ कुटुंबांना पुराचा फटका बसला होता. अद्याप त्यापैकी ६१ हजार ८६४ इतक्या जणांचे कुटुंबांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अतिवृष्टीमुळे ५ हजार ७८९ घरांचे नुकसान झाले आहेत. त्यातील १ हजार १०७ घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे. जिल्ह्यातील महापुरामध्ये सर्वाधिक नुकसान हे बळीराजाचे झालेले आहे. ५९ हजार हेक्टर इतके शेतीचे क्षेत्र या महापूरात बाधित झाले. नुकसानग्रस्त निम्म्या शेतीचे पंचनामे अजूनही झाले नाहीत.
हे ही वाचा:
कोंबड्याचे ‘कुकू च कू’, नी कश्मीरातील पहाट
आसाम काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा राजीनामा
मुलीला डोळा मारणारा गेला चार वर्षांसाठी तुरुंगात
हस्तकला, हातमाग, क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एक हजार १६९ कारागीरांपैकी ९४१ जणांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अनेक गणेश मूर्तिकारांचेही या पुरात अपरिमित नुकसान झाले आहे. मूर्तीचे कारखानेच पाण्याखाली गेल्याने मूर्तीकार हतबल झालेला आहे.