महापुर टाळण्यासाठी अलमट्टी, हिप्परगा धरणातून पाण्याचा विसर्ग

महापुर टाळण्यासाठी अलमट्टी, हिप्परगा धरणातून पाण्याचा विसर्ग

पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषत: सांगली, कोल्हापूरमधील महापुराचं संकट टाळण्यासाठी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकसोबत वाटाघाटी करत आहेत. त्यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट घेतली. अलमट्टी आणि हिप्परगा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यास सांगली-कोल्हापूरमधील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांमधील पाण्याची पातळी घटेल, त्यामुळे महापुराचं संकट टळेल.

त्या अनुषंगानेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि मंत्री स्तरावर कर्नाटकातील बंगळुरुत बैठक होत आहे. या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित आहेत. पूर नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा करुन, महापुराचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे.

जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना घेऊन ही चर्चा होणार आहे. कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते त्यापासून कमीत कमी कसं नुकसान होईल आणि पूरनियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता मंत्री स्तरावर होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल हा प्रयत्न असणार आहे, असेही त्यांनी सांगितलं होतं.

हे ही वाचा:

साऊदम्पटनमध्ये सूर्याचं दर्शन, मॅचची वेळ बदलली

आता मुंबईकर मतदार शिवसेनेला धडा शिकवेल

कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट

१२ ते १८ वयोगटातील मुलांसाठीही लवकरच लस येणार?

सातारा, सांगली, कोल्हापूर भागात २०१९ मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आम्ही कायमच प्रयत्नशील आहोत. मागील वर्षी देखील राज्याच्या जलसंपदा विभागाने पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन करून पूर परिस्थिती टाळली होती. पूर परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून यापूर्वी कर्नाटक राज्यासोबत मुख्य अभियंता व सचिव स्तरावरील चर्चा झालेल्या आहेत. याबाबतीतच मी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेणार आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं होतं.

Exit mobile version