बीकेसी पूल दुर्घटनेवरील चर्चा थांबवण्यासाठी युतीची पुडी सोडली

बीकेसी पूल दुर्घटनेवरील चर्चा थांबवण्यासाठी युतीची पुडी सोडली

“दुर्घटनेवरून प्रसारमाध्यमांचे लक्ष हटवण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीची आशा दाखवणारे वक्तव्य केले का?” असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते शुक्रवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात अनेकांना संभ्रमात टाकणारी ठरली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिशेने पाहत, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”, असे म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात कालपासून पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीची चर्चा रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वेगळाच आरोप केला आहे. शुक्रवारी पहाटे मुंबईतील बीकेसी परिसरात निर्माणाधीन असलेल्या एका उड्डाणपुलाचा गर्डर कोसळून दुर्घटना घडली होती. यामध्ये १० मजूर जखमी झाले होते. या दुर्घटनेवरून प्रसारमाध्यमांचे लक्ष हटवण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीची आशा दाखवणारे वक्तव्य केले का, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता शिवसेना यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुंबईच्या बीकेसी परिसरात शुक्रवारी पहाटे उड्डाणपूल कोसळल्याची दुर्घटना घडली. हा पूल निर्माणाधीन होता. उड्डाणपूलाचे काम सुरु असल्यामुळे नेहमीप्रमाणे काही मजूर पूलावर होते. मात्र, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक हा पूल पडायला सुरुवात झाली. हा अपघात झाला तेव्हा पूलावर तब्बल २० ते २५ मजूर काम करत होते.

हे ही वाचा:

जोगेश्वरीमधून सातवा दहशतवादी पकडला

…म्हणून अनिल देशमुखांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

विद्यापीठ अधिकारी घेऊ शकणार फक्त १२ लाखांपर्यंतच गाडी!

तिला व्हायचे आहे बॅडमिंटनपटू; पण पोट भरण्यासाठी चिरावी लागतेय भाजी

त्यावेळी या पूलाचा एक गर्डर निखळून खाली पडायला सुरुवात झाली. पूल पडायला सुरुवात झाल्यानंतर काही मजूरांना त्याचा अंदाज झाला. त्यामुळे या मजूरांनी पूलावरुन वेळीच पळ काढला. मात्र, आठ ते दहा मजूर हे पूलासोबतच खाली कोसळले. हे सर्वजण थेट बाजूच्या नाल्यात पडल्याने जखमी झाले होते. यावरुन भाजपचे नेते शिवसेनेला लक्ष्य करणार, हे अपेक्षित होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये टाकलेल्या गुगलीनंतर या घटनेचा अनेकांना विसर पडला होता.

Exit mobile version