पाकिस्तानमध्ये साधारण आठवड्यापूर्वी निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लीम लिग- नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात युतीसंबंधी चर्चा चालू होती. अखेर यावर तोडगा निघाला असून या दोन्ही पक्षांचे युतीवर एकमत झाले आहे.
पाकिस्तान मुस्लीम लिग- नवाझ आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी यांच्यात युती होऊन सरकार स्थापन होणार आहे. सत्तेत कोणाचा किती सहभाग असेल, कोणाला किती पदे मिळणार तसेच पंतप्रधानदी कोणाची निवड होणार? या सर्वांवर प्रभावी तोडगा काढण्यात आला आहे. पीएमएल-एन आणि पीपीपी या दोन्ही पक्षांत युती झाली असून लवकरच ते पाकिस्तानमध्ये सरकारची स्थापना करणार आहेत.
पीपीपी आणि पीएमएल-एन या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत पाकिस्तानमध्ये मंगळवारी रात्री एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमच्यात युती झाली असून लवकरच आम्ही सत्तास्थापनेचा दावा करू, अशी घोषणा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होतील तर पीपीपीचे सह-अध्यक्ष असिफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून निवड केली जाईल.
हे ही वाचा:
हिंदू नावाने राहणारे मुस्लिम बांगलादेशी दाम्पत्य अटकेत
मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर
दातांवर शस्त्रक्रिया करताना युवक दगावला!
कोलकत्ता उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले
पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीत निवडणूक लढवण्यावर बंदी असलेल्या पीटीआय पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांचा गट या निवडणुकीत सर्वांत मोठा गट म्हणून समोर आला होता. पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्रानुसार एकूण ९३ जागांवर अपक्ष उमेदवारांचा तर पीएमएल-एन पक्षाचा ७५ आणि पीपीपीचा ५४ जागांवर विजय झाला.