“आगामी राज्यातील १४ महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होईलच असं नाही. आम्ही स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊनच निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत, अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा राग आलापल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्यावर नाराज झाल्याची माहिती समोर आली होती. आता नवाब मलिक यांच्यावर देखील हे नाराज होणार का? असा सवाल राजकीय वर्तुळांमधून केला जात आहे.
हे ही वाचा:
मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी आता टीशर्ट घाला
शिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधल्याचे चित्र
…जशी याच्या बापाची जहागिर होती
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार असल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणूका होणार आहेत. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही, अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचं मलिक म्हणाले. काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही. त्यामुळे काही ठिकाणी कॉंग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी–शिवसेना लढत होणार आहे. ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होणार असल्याचंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत, अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजपा अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही. अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.