युवा लेखक, सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे: आक्षेप आणि वास्तव’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मंगळवार २ नोव्हेंबर रोजी म्हणजेच धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर हा प्रकाशन सोहळा पार पाडला. पुण्यातील डेक्कन भागातील कर्वे रोड येथे असलेल्या प्रसिद्ध अशा स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे हा प्रकाशन समारंभ झाला.
नाशिक येथील इतिहास अध्यासक प्राध्यापक संतोष शेलार यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तर जेष्ठ विचारवंत, माजी खासदार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्रदीप दादा रावत हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रकाशन सोहळ्याला पुण्यातील सावरकरप्रेमी तरूणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती.
हे ही वाचा:
भाजपासाठी का आहे मध्यप्रदेशच्या जोबटचा विजय महत्वाचा?
तेलंगणामध्येही भाजपाचा बोलबाला
‘पंजाब लोक काँग्रेस’सह कॅप्टन मैदानात
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर कायमच हा आरोप त्यांच्या विरोधकांकडून केला जातो की सावरकरांनी इंग्रजांची माफी मागणारी पत्र त्यांना पाठवली. या आरोपाच्या अनुषंगाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची नाहक बदनामी चालवण्याचा घाट सावरकर विरोधकांतर्फे घातला जातो. या सर्व आरोपांना सणसणीत उत्तर म्हणजे जोग यांचे हे नवे पुस्तक असणार आहे. सावरकरांच्या तथाकथित क्षमापत्रांचे नेमके वास्तव काय? त्या मागे स्वातंत्र्यवीरांचे विचार काय होते? भूमिका काय होती? या सर्वच गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न अक्षय जोग यांच्या या नव्या पुस्तकातून करण्यात आला आहे. या आधी अक्षय जोग यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव हे पुस्तक प्रकाशित झाले असून त्याला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.