समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. त्याबद्दल त्यांनी आभार मानले असले तरी ते सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. ते त्यांच्या कुटुंबीयांसह सोहळ्यानंतर सर्वसामान्य भक्त म्हणून राम मंदिराला भेट देणार आहेत. त्यांनी ही भूमिका शनिवारी स्पष्ट केली.
अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वर राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण मिळाल्याचे आणि ते राम मंदिराला उद्घाटन सोहळ्यानंतर सर्वसामान्य भक्त म्हणून भेट देणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आपुलकीने आमंत्रण दिल्याबद्दल आभार. हा सोहळा यशस्वीपणे पार पाडावा, यासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. मी माझ्या कुटुंबीयांसह सर्वसामान्य भक्त म्हणून सोहळ्यानंतर राम मंदिराला नक्कीच भेट देऊ,’ असे पत्र त्यांनी मंदिर ट्रस्टला दिले आहे. या पत्रात त्यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे अभिनंदनही केले आहे. हे पत्र त्यांनी ‘एक्स’वर जाहीर केले आहे.
विविध राजकीय पक्षांच्या समारंभातील उपस्थितीवरून जोरदार राजकीय वाद सुरू असतानाच अखिलेश यादव यांचे हे स्पष्टीकरण आले आहे. काँग्रेस पक्षाने हा कार्यक्रम धार्मिकऐवजी राजकीय बनवला आहे, असा आरोप करत २२ जानेवारी रोजीच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. यावरून भाजपने काँग्रेसवर टीका केल्यानंतर शुक्रवारी यादव यांनी भाजपकडून विरोधकांचा अपमान होत असल्याचा आरोप केला.
हे ही वाचा..
घरची माणसं टिकेनात; चालले ‘भारत जोडो’ला!
दीड वर्षापूर्वी सुईही टोचली नाही आणि टाकाही नाही
नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंचे हात बळकट करण्यासाठी काम करणार
चिनी ड्रॅगनच्या वेटोळ्यात मालदीवचे वाटोळे!
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आघाडीचे काँग्रेस आणि सपा हे घटकपक्ष आहेत. इतर प्रमुख विरोधी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) यांसह तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनीही राम मंदिराचे उद्घाटन ही ‘निवडणुकीचे नाटक’ असल्याचे मत व्यक्त केले. भाजपचे नेते राम मंदिराचे निमंत्रण नाकारणाऱ्या पक्षांवर ‘रामविरोधी’ असे लेबल लावून हल्ला चढवत आहेत.