सपाचे आमीष…फॉर्म भरा, ३०० युनिट वीज मिळवा!

सपाचे आमीष…फॉर्म भरा, ३०० युनिट वीज मिळवा!

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीची धामधूम सुरु असताना समाजवादी पार्टीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. समाजवादी पार्टीच्या एका फॉर्म मध्ये नाव नोंदवा आणि ३०० युनिट वीज मोफत मिळवा, अशी घोषणा सपा नेते अखिलेश यादव यांनी केली आहे. विशेष म्हणजे, सपा मतांसाठी या ऑफरच्या मोहिमेला उद्यापासूनच सुरवात करणार आहे.

सपा नेते अखिलेश यादव यांनी आज लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ज्यांना तीनशे युनिट वीज मोफत हवी आहे, त्यांनी फॉर्ममध्ये आपलं नाव लिहून हा फॉर्म पक्षाकडे जमा करा. तुम्हाला वीज देऊ. मोफत वीज देण्याचा हा मुद्दा निवडणूक घोषणापत्रातही समाविष्ट करण्यात आला आहे, असं सांगतानाच उद्यापासूनच हे फॉर्म भरण्याचं अभियान सुरू करण्यात येईल. ज्या नावाने विजेचे बिल येते, तेच नाव या फॉर्ममध्ये भरायचं आहे, असं अखिलेश यादव यांनी मतांसाठी जनतेला आमीष दाखवलं आहे.

चंद्रशेखर आजाद यांच्या भीम आर्मीसोबत युती झाली नाही. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ओम प्रकाश राजभर यांनी सल्ला दिला आहे. त्यांचा जो काही सल्ला असेल तो ऐकून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं अखिलेश म्हणाले.

लॅपटॉप वाटप केल्यामुळे अनेकांना नोकरी मिळाली असा दावा त्यांनी केला आहे. लखनऊमध्ये एचसीएलमध्ये चार हजार तरुणांना नोकरी मिळाली. कानपूर मेट्रोमध्येही हजारोंच्या संख्येने नोकरी मिळाली. असे ते म्हणाले आहेत. सिंचनासाठी बिनव्याजी कर्ज देण्याची त्याशिवाय, शेतकऱ्यांसाठी विमा आणि पेन्शनचीही व्यवस्था केली जाईल. असं कालच्या पत्रकार परिषदेत यादव यांनी मतांसाठी काही घोषणा केल्या होत्या.

Exit mobile version