देशपातळीवर भाजपाला पर्याय म्हणून विरोधकांनी इंडिया आघाडी उभी केली आहे. मात्र, या आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. यातील मुख्य पक्षांचे अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. जागा वाटपाचा तिढाही अजून सुटलेला नाही, अशातच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला तीन दिवसांपूर्वी मणिपूर येथून सुरुवात झाली आहे. ही यात्रा सध्या नागालँडमध्ये दाखल झाली आहे.
राहुल गांधी या यात्रेतला सर्वाधिक काळ उत्तर प्रदेशमध्ये घालवणार आहे. या यात्रेतले ११ ते १२ दिवस राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये असणार आहेत. राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये ११०० हून अधिक किलोमीटर अंतर चालणार आहेत. यांनी त्यांच्या सर्व मित्रपक्षांना या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव या यात्रेत सहभागी होणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इंडिया आघाडीतला काँग्रेसचा मित्रपक्ष असलेला समाजवादी पार्टी हा पक्ष या यात्रेत सहभागी होणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी ११ दिवसांत १,०७४ किमी प्रवास करणार आहेत आणि या काळात २० जिल्ह्यांना भेट देणार आहेत. दरम्यान, ही यात्रा उत्तर प्रदेशमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या पक्षाला धक्का बसला आहे. अखिलेश यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, “आम्हाला ना भाजपा बोलवत आहे, ना काँग्रेसवाले. त्यामुळे काँग्रेसने अद्याप समाजवादी पार्टीला किंवा अखिलेश यादव यांना ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होण्याचं निमंत्रण दिलेलं नाही, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांनी निवडणुकीपूर्वी स्वतःची यात्रा काढण्यावर भाष्य केलं आहे. अखिलेश यादव यांचा पक्ष ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ अशी पदयात्रा काढणार आहे. उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून ही यात्रा निघणार आहे.
हे ही वाचा:
इराणची पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई; दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त
माजी सैनिकाची अनोखी रामभक्ती; ७ कोटी वेळा लिहिले ‘श्री राम’
विराट कोहलीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेपाक्षीच्या वीरभद्र मंदिराला दिली भेट
इंडिया आघाडीतील जागा वाटपाबद्दलही अखिलेश यादव यांनी यापूर्वीदेखील भाष्य केलं होतं. राहुल गांधी यांच्या यात्रेआधी लोकसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप पूर्ण करायला हवं. आधी जागावाटप, त्यानंतर यात्रा आणि मग निवडणूक असा क्रम असायला हवा. तसं केल्यास आपण सगळेच जण भक्कमपणे भाजपाविरोधात लढू शकतो. राहुल गांधींच्या यात्रेआधी जागावाटप झालं तर अनेकजण या यात्रेत स्वतःहून सहभागी होतील, मदतीसाठी पुढे येतील, अशी टीका त्यांनी केली होती.