“अजित पवार आमचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी केलं. त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक गट फुटला. पक्षाच्या विचारधारेविरोधात जाऊन भाजपाशी हातमिळवणी केली. याला फूट म्हणायच नाहीतर काय? अजित पवार गटाने शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली, याला आम्ही फूट मानतो,” असे खडेबोल संजय राऊत यांनी शरद पवारांना सुनावले आहेत.
महाराष्ट्रात वैचारिक लढा सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली की नाही हे जनता ठरवेल. फूट पडलेली दिसत आहे. जसा शिवसेनेतून फुटून एक गट वेगळा तयार झाला. त्यांनी पक्षाची भूमिका, पक्षप्रमुखांचा विचार बाजूला ठेवला. भाजपा बरोबर हातमिळवणी केली. हा पक्षद्रोह आहे. त्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केल्याचे संजय राऊत म्हणाले.
शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. इंडिया आघाडीत देशातील प्रमुख राजकीय पक्षाचा हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात गट निर्माण झाला आहे आणि त्या गटाचे शरद पवार प्रमुख घटक आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.
राष्ट्रवादीतील एका गटाने ईडीच्या भीतीने भाजपाबरोबर हातमिळवणी केली. शरद पवार यांना मानणारा एका मोठा वर्ग महाविकास आघाडीसोबत आहे, असं संजय राऊत म्हणाले. “आम्ही ठरवलं आहे महाराष्ट्रात, देशपातळीवर भाजपाचा पराभव करायचा आहे. जयंत पाटील, शरद पवार यांच्यासोबत महाविकास आघाडीबद्दल चर्चा करतो. आम्ही तटकरे किंवा अजित पवार यांच्याशी बोलत नाही, असं विधान संजय राऊत यांनी केले आहे.
हे ही वाचा:
शरद पवार, सुप्रिया सुळे लवकरच मोदी सरकारला पाठिंबा देतील
मोदी-शी जिनपिंग ब्रिक्स परिषदेत एकमेकांना भेटले
‘अकेला देवेंद्र’ने काय करून दाखवले बघितले ना?
भेसळीसाठी साठविलेला २ कोटी २४ लाखाचा लवंग कांडीचा साठा जप्त
“शरद पवार यांचा दोन दगडांवर पाय नाही. ते भाजपासोबत जाणार नाहीत. ती त्यांची वैचारिक भूमिका कधीच नव्हती. शरद पवार यशवंतराव चव्हाण यांना गुरुस्थानी मानतात. त्यांना भाजपाचा विचार मान्य नाही,” असं मत संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.