‘मुख्यमंत्र्यांच्या घोषणेआधीच उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय; ही तर श्रेयाची लढाई’

‘मुख्यमंत्र्यांच्या घोषणेआधीच उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय; ही तर श्रेयाची लढाई’

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांची टीका

मुख्यमंत्री ८ वाजता बोलणार, त्याआधीच उपमुख्यमंत्री घोषणा करून मोकळे. सर्व लढाई श्रेयाची, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी टीकास्त्र सोडले आहे.

महाराष्ट्रात सध्या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. या तीन पक्षांतील नेत्यांमध्ये वारंवार श्रेयासाठी संघर्ष होताना पाहायला मिळतो. निर्बंध शिथिल करण्याच्या मुद्द्यावरून आता हे श्रेयासाठी सुरू असलेल्या लढाईचे आणखी एक रूप पाहायला मिळाले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ८ पर्यंत दुकाने खुली राहणार आहेत, तर हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरू राहतील, असे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार असताना त्याआधीच उपमुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

पुण्यातील मॉल्सही आता सोमवार ते शुक्रवार रात्री आठपर्यंत खुले राहतील, पण मॉलमध्ये केवळ दोन लसी घेतलेल्यांनाच प्रवेश असेल. जलतरण तलावांना परवानगी नाही. सात टक्केच्या वर पॉझिटिव्हिटी दर गेल्यास ही मुभा थांबविण्यात येणार आहे.

मागे मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनीही मुख्यमंत्र्यांच्या घोषणेआधीच निर्णय जाहीर केल्यानंतर गोंधळ उडाला होता. आताही अजित पवार यांनी स्वतः झटपट निर्णय जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांपाशी बोलण्यासाठी काही शिल्लक राहिले असेल का, असा प्रश्न उपस्थित होणार आहे.

Exit mobile version