राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शरद पवारांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. अजित पवारांच्या भूमिकेमुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवा अध्यक्ष काम करेल. देशभरात बैठका घेणं, लोकांना भेटणं हे सुरूच राहिलं. कुणीही अध्यक्ष झालं; प्रांताध्यक्ष झालं तरी शरद पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे, असं अजित पवार म्हणाले. शरद पवारांनी घेतलेला निर्णय हा कालच होणार होता मात्र काल १ मे असल्यामुळे निर्णय जाहीर केला नाही. आज ना उद्या हा निर्णय होणार होता, असे म्हणत अजित पवारांनी वेगळी भूमिका मांडली आहे.
उद्या नवीन अध्यक्ष झाला तर अडचण काय आहे? शरद पवारांनी हाक दिल्यावर सगळे एकत्र येणार आहेत. खासदारकी आमदारकी बाबत सर्व निर्णय शरद पवारच घेतील, असं अजित पवार म्हणाले. तसेच अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना न बोलण्याचा देखील सल्ला दिला. अजित पवारांनी वेगळी भूमिका मांडली तरी कार्यकर्ते आणि इतर नेते हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
हे ही वाचा:
महाराष्ट्राच्या राजकारणात हडकंप, शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार
मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचे परीक्षक झोनफ्रिलोंचे अकाली निधन; अनेकांना धक्का
महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे निधन
भिवंडीतून गायब झालेले बाळ सापडले झारखंडमध्ये
काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान पवार यांनी मोठी घोषणा केली. कोणतीही निवडणूक लढवणार नसून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची मोठी घोषणा शरद पवार यांनी केली. यापुढे तीनच वर्षे राजकारणात राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. खासदारकीची तीन वर्षे शिल्लक असून त्या दरम्यान केंद्राच्या आणि राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष घालणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले.