गेल्या काही महिन्यांपासून शांततेत सुरू असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने शुक्रवार, ८ एप्रिल रोजी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी चप्पलफेक आणि दगडफेक केली. या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे,’ असे विधान अजित पवार यांनी केले आहे. पुढे अजित पवार म्हणाले की, “मला आश्चर्य वाटत की, दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलन यशस्वी झाले म्हणून गुलाल उधळण्यात आला. मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा काय उद्देश होता,” असे प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले आहेत.
“या घटनेची माहिती पोलिसांना आधी कशी कळली नाही. आंदोलक घटनास्थळी पोहचल्यावर मीडिया लगेचच तिथे पोहचली होती. अर्थात मीडियाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणं. पण मीडियाला जे कळलं ते पोलीस यंत्रणेला का कळलं नाही,” असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा:
सोमय्या पिता पुत्रांना मुंबई पोलिसांचे समन्स
पाच लाख दिव्यांपासून साकारली जाणार प्रभू रामचंद्रांची भव्य कलाकृती
नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने समर्थनीय नाहीत.
अजित पवार म्हणाले की, ‘पोलीस विभाग या मागच्या सूत्रधाराचा शोध घेतील. एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्यात आली. त्यामागे कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलीय. आंदोलक कर्मचाऱ्यांनी तारतम्य सोडले आहे. जी भाषा वापरण्यात आली ती आपल्या संस्कृतीत बसत नाही. पोलीस यंत्रणा याचा तपास करुन यामागचा कोण मास्टरमाईंड आहे याचा शोध घेतील,” असे अजित पवार म्हणाले.