ज्येष्ठ समाजसेवक आणि लेखक बाबा आढाव हे सध्या पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा संशय आढाव यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली आणि त्यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले की, “प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. बाबा आढव यांनी मांडलेल्या भूमिकेतील काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. काही मुद्दे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहेत. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यात आम्हाला ढवळाढवळ करता येत नाही. त्यांना जे योग्य वाटतं, ते निर्णय त्यांनी दिले आहेत. मी स्वतः बारामतीचा उमेदवार होतो. मी पाहिलं की संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर मतदारांची गर्दी वाढली होती. मी वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की सहा वाजेपर्यंत जेवढे मतदार येतील त्या सर्वांसाठी बाहेर वीजेची व्यवस्था करा आणि सगळ्यांना मतदान करता येईल याची काळजी घ्या,” असं अजित पवार म्हणाले.
हे ही वाचा..
राज्यात ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी?
कॅनडाचे खलिस्तानी प्रेम; दहशतवादी अर्श डल्लाला मिळाला जामीन
‘न्यूज २४’ कडून भारताचा जीडीपी कमी झाल्याचा खोटा दावा
केरळातील कम्युनिस्ट पार्टी सांप्रदायिक शक्तींच्या नियंत्रणाखाली म्हणत माजी उपाध्यक्ष भाजपात
पुढे अजित पवार म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३१ जागा निवडून आल्या होत्या. आमच्या केवळ १७ जागा आल्या. आम्ही तो पराभव मान्य केला. कारण तो जनतेचा कौल होता. त्यावेळी आम्ही किंवा कोणी ईव्हीएमबाबत बोललो नाही. विधानसभेत आम्हाला यश मिळाल्यावर हा प्रश्न आला आहे. बारामतीमध्ये तेव्हा माझा उमेदवार ४८ हजार मतांनी पराभूत झाला होता. मात्र, मी त्याच मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आलो. कारण बारामतीच्या जनतेचं पहिल्यापासून ठरलेलं आहे की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. लोकसभा निवडणुकीत ज्या गावांमधून आम्हाला मतदान मिळालं नाही, तिथं मला विधानसभेच्या वेळी भरभरून मतदान मिळालं आहे. आता पाच महिन्यांत जनतेचा कौल बदलला याला आम्ही काय करणार,” असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.