ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा पार पडला असून यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली असून दुसरीकडे शरद पवार यांच्यावर निशाणा देखील साधला आहे.
“वय झाल्यानंतर आपण थांबायचे असते. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय ७५ झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. ८० वय झालं तरी माणूस थांबत नाही. काय चाललंय काय, आम्ही आहे ना, आम्ही कुठं चुकलो तर सांगा आम्हाला, आमच्यामध्ये तेवढी ताकद आणि धमक आहे. ४ ते ५ वेळा आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. चांगल्या योजना राबवल्या आहेत,” असा खोचक टोला अजित पवारांनी शरद पवार यांना लगावला आहे.
भारताला नरेंद्र मोदींमुळेच जगभरात प्रतिष्ठा मिळाली
अजित पवारांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले. “जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताला प्रतिष्ठा मिळाली आहे. नरेंद्र मोदी १८- १८ तास काम करतात. दिवाळीला सुद्धा ते घरी जात नाहीत. भारत सर्व क्षेत्रात सध्या आगेकुच करत आहेत. चंद्रयान देखील यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचले आहे. जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था टॉप ५ वर पोहोचली आहे. ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. देशातील एकही व्यक्ती उपाशी पोटी झोपणार नाही, याची काळजी नरेंद्र मोदी घेत आहेत,” असं अजित पवार म्हणाले.
शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवरच राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सुरू
शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मिायांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. त्याच मार्गावर आपल्याला पुढे जायचे आहे. सर्व धर्मियांच्या सणांचा आपण आदर केला पाहिजे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरु आहे. कधीही कोणाला वाऱ्यावर सोडायचे नाही. एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायचे आहे. राज्यातील जनता आपल्या पाठीशी उभी राहणार आहे, असा दावाही अजित पवार यांनी केला.
हे ही वाचा:
पोटातून आणलेली कोकेनची कॅप्सूल पकडली; सकिनाका येथे दोन विदेशी नागरिकांना अटक!
मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे १०० वर्षांची परंपरा लाभली!
शिवछत्रपती पुरस्कार यादीतून डावललेल्या खेळांच्या संघटना नाराज
निवडणुकीपूर्वी बांग्लादेशात हिंसाचार, मतदान केंद्राला लावली आग!
सर्वसामान्यांचे कल्याण हीच भूमिका
सत्तेत राहिलो तरच जनतेची कामे होतात. सध्या मंत्री आदिती तटकरे महिला धोरणावर चांगले काम करत आहेत. मेलो तरी चालेल पण सर्वसामान्यांची कामे झाली पाहिजेत. तरुण-तरुणींचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. सर्वसामन्यांचे कल्याण हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. शहरी भागाला पाणीपुरवठा करताना ग्रामीण भागावर अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. वंदे भारत ट्रेन सुरू केली. समृद्धी महामार्ग देखील सुरू केलेला आहे. तरुण- तरुणींच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असंही अजित पवारांनी स्पष्ट केले.