राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्यांच्या भाजपाप्रवेशासंदर्भातील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या वावडयांबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. माझ्याविषयी माझ्या पक्षातील प्रवक्ते बोलतील, पण बाकीच्यांना ते वकीलपत्र मी दिलेले नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एकप्रकारे निशाणा साधला. माझ्या पक्षात आकस असणारे कुणी नाही. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते हे जणू ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत असे वागत आहेत. मी ही बाब महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडणार आहे. ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षाचं सांगा ना. तुमच्या पक्षाचे मुखपत्र चालवता त्याबद्दल लिहा. आम्हाला कोट करून कशाला लिहायचे, अशा शब्दांत अजित पवार यांनी ‘सामना’वर तीर चालवला.
सामनामधील रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीचा दाखला देत त्यात शरद पवारांनी पक्षातील काही लोक बाहेर जाऊ इच्छितात पण तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत जाणार नाही, असे विधान केल्याचे म्हटले होते. त्यावरूनच अजित पवार पत्रकारांसमोर संतापले.
अजित पवार पत्रकारांना सुनावताना म्हणाले की, आपण माझ्याविषयी ज्या बातम्या दाखवता, पसरवता त्यात तथ्य नाही. ४० आमदारांच्या सह्या घेतल्या असे दाखवले जाते. असे सह्या घेण्याचे कारण नाही. आम्ही राष्ट्रवादी पक्षाचेच आहोत, राष्ट्रवादीतच राहणार आहोत. इतर राजकीय पक्षही मते व्यक्त करत आहेत. तो त्यांचा अधिकार. पण आज जे आमदार मला भेटायला आलेले होते ते मी आहे म्हणून भेटायला आले. ती नेहमीची पद्धत आहे. वेगळा अर्थ काढू नका. सगळ्या आमदारांची वेगळी कामे होती. मला सगळ्यांना सांगायचे आहे. काळजी करू नका.
अजित पवारांनी खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाचा दाखला देत सांगितले की, त्या कार्यक्रमात श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. काहीजणांना प्राण गमवावे लागले. मी विरोधी पक्ष नेता म्हणून त्यातला बाधितांची भेट रुग्णालयात जाऊन घेतली. होतो. संकट येते तेव्हा त्यांना आधार देण्याची परंपरा आहे. ९ ते ११ वाजल्याच्या दरम्यान कार्यक्रम झाला असता तर तेवढा त्रास झाला नसता. १३-१४ कोटी रुपये खर्च करूनही मंडप का घातला नाही. भव्यदिव्य मंडप टाकायला हरकत नव्हती. माणसांच्या जीवाशी का खेळता. राजभवनला महत्त्वाचा हॉल आहे तिथेही कार्यक्रम घेता आला असता. पण निष्काळजीपणा नडला.
हे ही वाचा:
लंडनच्या खलिस्तानी समर्थकांविरोधात एनआयए करणार चौकशी
मुंबई विमानतळावर जप्त केले १६ कोटी रुपयांचे हेरॉईन
सीरियात मशरूम पिकवणाऱ्या ३१ शेतकऱ्यांची हत्या
पुन्हा एकदा पत्रकारांकडे मोहरा वळवत अजित पवार म्हणाले की, देवगिरीबाहेर कॅमेरे काय लावता मी तिथे बोलणार आहे का, पार्टी कार्यालयात बोलेन. कार्यक्रमानिमित्ताने दुसऱ्या शहरात गेलो तर तिथे बोलेन. आपण काही सभ्यता पाळली पाहिजे. बातम्या मिळाल्या पाहिजेत हे मान्य पण इतरांना मिळाली तर तुम्हाला कशी मिळत नाही या दबावातून या अफवा पसरतात. तुम्हीच सगळे अंदाज व्यक्त करत आहात. तुम्हाला प्रतिज्ञापत्रा लिहून देऊ का, असे मी विचारले होते. वज्रूमूठ सभेत बोलणाऱ्यांबद्दल बातमी देण्यापेक्षा न अजित पवार का बोलले नाहीत, याची बातमी दिली जाते.
अजित पवारांच्या ट्विटर अकाऊंटवरी राष्ट्रवादीचा झेंडा हटवल्याच्या चर्चेबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिले ते म्हणाले की, माझं ट्विट दाखवत आहेत. माझ्या ट्विटमध्ये मी उपमुख्यमंत्री असतानाचे झेंड्याचे चित्र होते. झेंडा काढला. त्यात काय एवढे. झेंडा लावून ठेवू का.काही झालं तर मीच सांगेन दुसरीकडून बातम्या काढायची गरज नाही. आमच्या मनात काहीही नाही. बातम्या पेरण्याचं काम काही लोक करत आहे. विघ्नसंतोषी लोक असतील. मी भाजपाला पाठिंबा देणार अशी शक्यता आमच्यापैकी कुणीही व्यक्त केलेली नाही. गॉसिप तुम्ही करता. मी सांगितले आहे कधी?
दुसऱ्या पक्षाचे प्रवक्ते अजित पवारांबद्दल अंदाज व्यक्त करत असल्याबद्दलही अजित पवारांनी त्यांची हजेरी घेतली. ते म्हणाले की, कुणीही आमचे वकीलपत्र घेऊ नका. आमची भूमिका मांडण्यासाठी आमचा प्रवक्ता सक्षम आहे. आता थांबवा हे. कारण नसताना गैरसमज करू नका. सह्या घेतलेल्या नाहीत. आमची पण सहनशीलता संपते. अंत होऊ देऊ नका.