राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने सकारात्मक भूमिका मांडली.
रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, बारसू येथील प्रकल्पाबाबत पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी हे महत्त्वाचेच पण बेरोजगारीचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. जर या रिफायनरीतून १ लाख रोजगार उपलब्ध होणार असतील तर त्याचा विचार व्हायला हवा. ज्या ठिकाणी ही रिफायनरी उभी राहणार आहे, त्याठिकाणी कोणतीही शेते नाहीत, घरे नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या, स्थानिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही नाही.
अजित पवारांच्या ही भूमिका घेत आपण या प्रकल्पाबाबत आक्रस्ताळी भूमिका घेणार नाही, असेच त्यांनी सूचविले आहे.
अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिलेला आहे. मग त्यांच्या मताचा विचार व्हायला पाहिजे.
राजन साळवी यांनी या प्रकल्पाला काही दिवसांपूर्वी पाठिंबा दिला होता. पण उद्धव ठाकरे गट मात्र या प्रकल्पाच्या विरोधात आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मात्र बारसूत जाऊन आंदोलकांना पाठिंबा दिला.
हे ही वाचा:
मद्यपी पोलिसांना हिमंता बिस्वसर्मांनी कायमचे घरी पाठवले
उत्तर प्रदेशच्या राम सिंह यांनी केला चक्क रेडिओंचा संग्रह!
नेपाळवरून येऊन ‘ते’ करतात रत्नागिरीतील हापूस आंब्याची राखण !
३८ लाखांचे बक्षीस असलेले तीन नक्षलवादी धाडले यमसदनी
अजित पवार म्हणाले की, नाणारचा प्रकल्प रद्द झाल्यानंतर बारसूचे नाव सुचविण्यात आले. तिथे जे आंदोलक आहेत ते स्थानिक आहेत का, त्यात किती एनजीओ आहेत, तिथे किती बाहेरचे लोक आहेत याची तपासणी करायला हवी. अर्थात, त्याठिकाणी स्थानिकांचे काय प्रश्न आहेत हे जाणून घेतले पाहिजेत तसेच पर्यावरणाची नेमकी किती हानी होणार याचीही माहिती घेतली पाहिजे.
अजित पवारांनी सांगितले की, एन्रॉनच्या प्रकल्पाही इथे विरोध झाला होता, पण नंतर तो प्रकल्प कोकणात आला. मात्र त्यामुळे कुठल्या आंब्याला, काजूला नुकसान झाले?