25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणठाकरे, राऊत, केजरीवाल सगळेच ठरले ‘अनपढ’!

ठाकरे, राऊत, केजरीवाल सगळेच ठरले ‘अनपढ’!

अजित पवार हे विरोधी पक्षनेतेच जेव्हा त्याचे समर्थन करतात तेव्हा आता या विरोधकांना तोंड दाखवायला जागा राहात नाही

Google News Follow

Related

सध्या एकूणच देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून राजकारण सुरू आहे. नरेंद्र मोदी यांनी कोणती पदवी घेतली होती, ती खरी की खोटी, त्यांच्याकडे पदवीच नाही, असेल तर दाखवा अशा पद्धतीचे अत्यंत हीन दर्जाचे राजकारण देशभरात विरोधकांकडून केले जात आहे. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांचे सगळे प्रयत्न थकले आहेत याचे हे द्योतक आहे.

खरे तर पंतप्रधानांसारख्या एका उच्चपदस्थ व्यक्तीची पदवी आज ते ९ वर्षे पंतप्रधान आहेत त्यानंतर विचारणे हे विरोधकांच्या हीन प्रवृत्तीचे निदर्शक आहे. कारण त्याविषयीची सगळी माहिती आज सार्वजनिक झालेली आहे आणि त्यात काही नवीन नाही. निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ही सगळी माहिती उपलब्ध करून दिलेली असते. तशीच नरेंद्र मोदी यांच्या पदवीची माहितीही पब्लिक डोमेनमध्ये आहे. ती कधीही लपवलेली नाही.

जेव्हा नरेंद्र मोदी हे निवडणुकीच्या राजकारणातही उतरले नव्हते तेव्हा राजीव शुक्ला, जे आज काँग्रेसचे खासदार आहेत, त्यांनी पत्रकार म्हणून घेतलेल्या मुलाखतीतच मोदी यांनी आपल्या शिक्षणाविषयी केलेला उल्लेख आजही व्हीडिओच्या माध्यमातून उपलब्ध आहे. त्यात ते म्हणतात की, माझे शालेय शिक्षण माध्यमिक स्तरापर्यंत झाले. त्यानंतर मी शिक्षण सोडले पण नंतर मी पुढील शिक्षणही पूर्ण केले. बाहेरून मी बीए, एमएची परीक्षा उत्तीर्ण झालो. एमएमध्ये मी उत्तम गुणही घेतले. हे नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलेले आहेच पण अनेक माध्यमातून त्यांच्या या पदवीची छायाचित्रे उपलब्ध झालेली आहेत तरीही विरोधक हा मुद्दा लावून धऱत आहेत. कारण केवळ बदनामी करणे हाच त्यांचा उद्देश आहे.

२०२४च्या निवडणुका जवळ येत आहेत मग मोदींना घेरण्यासाठी काहीतरी उचापती कराव्या लागतीलच म्हणून मग हा पदवीचा मुद्दा उकरून काढण्यात आला आहे. त्यावर अचकट विचकट बोलायचे एवढेच आता विरोधकांच्या हाती राहिले आहे. उद्धव ठाकरे हेदेखील छत्रपती संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या सभेदरम्यान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबद्दल बोलले. संजय राऊत यांनी तर ही पदवी संसदेच्या नव्या इमारतीच्या बाहेर लावावी अशी भाषा केली. या नेत्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्या मानसिक स्थितीचे पूर्ण आकलन होते.

हे ही वाचा:

ग्रीन रिफायनरी कोकणातच उभी राहणार!

पंतप्रधानांनी सीबीआयला दिला संदेश, एकही भ्रष्टाचारी वाचता कामा नये!

भारतात आहेत १०० वर्षांपेक्षा जुनी २३४ मोठी धरणे

दहशतवादी यासीन भटकळ सह ११ जणांवर आरोप निश्चित, देशद्रोहाचा खटला चालणार

गुजरात विद्यापीठाने ती पदवी आपल्या वेबसाईटवर ठेवलेली आहे. त्याआधी २०१६मध्ये अमित शहा आणि अरुण जेटली या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ती पदवी भर पत्रकार परिषदेत दाखविलेली आहे. तरीही इतक्या वर्षांनी अजूनही पदवी पदवी असा नामजप विरोधक करत आहेत, याचे आश्चर्य वाटण्यापेक्षा त्यांची कीव येऊ लागते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तर दिल्ली विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करतात. देशाला ही पदवी जाणण्याचा अधिकार आहे की नाही, वगैरे मानभावीपणे विचारतात. खरोखरच देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी जाणण्याची गरज आहे का, हा प्रश्न तर आहेच. पण सगळ्या अधिकृत माध्यमात ही पदवी उपलब्ध असतानाही केजरीवाल पदवी दाखवा, पदवी दाखवा म्हणून जो कंठशोष करत आहेत तो आता हास्यास्पद आणि थट्टेचा विषय बनला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीए आणि एमए या दोन्ही पदवी मिळविल्या आहेत हे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्यापासून ठाकरेंपर्यंत कुणालाही उत्तर देण्याची काही गरजच राहिलेली नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट या सगळ्या आपल्या सहकाऱ्यांची म्हणा किंवा सोबतच्या मोदीविरोधकांची डिग्री दाखवून दिली आहे. अजित पवार यांना पत्रकारांनी याच पदवी संदर्भात प्रश्न विचारल्यावर ते थेट म्हणाले की, नरेंद्र मोदी जेव्हा २०१४मध्ये निवडून आले तेव्हा त्यांची पदवी पाहून त्यांना कुणी मतदान केलेले नाही. तर त्यांचा करिश्माच इतका होता की, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत नरेंद्र मोदी यांचा करिश्मा चालला आणि भाजपाला यश मिळाले. अजित पवार यांचे विधान केजरीवाल, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचे दात घशात घालणारे आहे.

भाजपाने या पदवीसंदर्भात समर्थन करणे स्वाभाविकच आहे पण अजित पवार हे विरोधी पक्षनेतेच जेव्हा त्याचे समर्थन करतात तेव्हा आता या विरोधकांना तोंड दाखवायला जागा राहात नाही. अजित पवार हे विरोधक असले तरी राजकारणात उत्तम बॅलन्स करण्याची कला शिकलेले आहेत. तरीही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचा मुखभंग करणे हेदेखील कौतुकास्पद ठरते. एक मात्र खरे की रोज पढालिखा प्रधानमंत्री चाहिए की नही वगैरे बाष्कळ प्रश्न विचारणारे केजरीवाल असोत की या पदवीवर प्रश्न उपस्थित करणारे ठाकरे, राऊत असोत हे सगळे अनपढ आहेत याचे प्रमाणपत्र मात्र अजित पवार यांनी सहीशिक्क्यासह जनतेला दिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा