राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते नाशिक दौऱ्यावर गेले असून तेथील भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात देशाला अतिशय कणखर नेतृत्व मिळालं आहे, असं अजित पवार नरेंद्र मोदींबद्दल बोलताना म्हणाले.
“पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा झपाट्याने विकास होतो आहे. जगभरात भारताची पत आणि प्रतिष्ठा वाढण्याचं काम होतं आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून देशात सर्वत्र विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने आपल्या राज्याच्या विकासाला आणखी गती देण्याचा प्रयत्न महायुतीचा आहे,” असा विश्वास अजित पवारांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं, तरी महाराष्ट्र सरकार जनतेच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचा दिलासा अजित पवारांनी जनतेला दिला. जनतेने अजिबात एकटं वाटून घ्यायला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात देशाला अतिशय कणखर नेतृत्व मिळालं आहे. उद्या काही मदत लागली तर पंतप्रधान मोदींना भेटून तशी मदत निश्चितपणे मिळवू शकतो, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
प. बंगाल निवडणुकीतील हिंसाचारांचा प्रारंभ झाला होता माकप, काँग्रेसकडून
लवकरच २६ नेव्ही राफेल भारतीय नौदलात दाखल होणार
चांद्रयान-३ च्या यशस्वी भरारीत महाराष्ट्राचा मोलाचा वाटा!
दिवसातले २० तास काम करण्याचे रहस्य काय?
यावेळी अजित पवारांनी चांद्रयान- ३ मोहिमेचे कौतुक केले. चांद्रयान मोहीम भारतीय आंतराळ संशोधन संस्थेची एक गरुडभरारी आहे. उद्याच्या काळात एक महासत्ता म्हणून भारताची आगेकूच चालली आहे. कुठल्याही क्षेत्रात भारत पाठीमागे राहणार नाही, याची खबरदारी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतली आहे, असे अजित पवार म्हणाले.