सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांनी चांगलीच धमाल उडवून दिली. नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी या पत्रकार परिषदेत आपले मनोगत व्यक्त केले.
५ डिसेंबरला शपथविधी आहे, त्यावेळी कोण कोण शपथ घेणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर एकनाथ शिंदेंनी ते आपल्याला संध्याकाळी कळेल असे म्हटले होते, पण अजित पवारांनी लागलीच टिप्पणी केली. ते म्हणाले की, शिंदेंचं संध्याकाळपर्यंत कळेल पण मी तर बुवा थांबणार नाही, शपथ घेणार. असं म्हटल्यावर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि सोबत असलेले सर्व नेते मोठमोठ्याने हसू लागले.
त्याला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अजितदादांना एकदा नाही तर सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेला शपथ घेण्याची सवय आहे, तेव्हाही सगळे खोखो हसत सुटले.
हे ही वाचा:
महायुतीच्या नेत्यांकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा!
देवेंद्र फडणवीस झाले गटनेते; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
सर्व आघाड्यांवर महाराष्ट्राला पुढे नेणार!
सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार
अजित पवार म्हणाले की, आम्हाला सरकार चालवण्याचा अनुभव आहे. आम्ही राज्याचा उत्तम विकास करू. तेव्हाही केंद्र सरकार सोबत होतं. आताही केंद्राची साथ असेल. आमच्या हातात पाच वर्ष आहेत. चांगलं बहुमत आहे. हा रुसला तो फुगला, याला सांभाळा त्याला सांभाळा वगैरे करण्याची काही गरज पडणार नाही. मुळात कोणी नाराज होणारच नाही. चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे ही जबाबदारी पार पाडतील. जी आश्वासने दिली ती पार पाडण्याचं काम आम्ही करू.
नव्या सरकारचा शपथविधी ५ डिसेंबरला आझाद मैदानावर होत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार उपस्थित राहणार आहेत.