इतके दिवस ‘वरिष्ठां’चे ऐकलेत, आता माझे ऐका!

अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना शरद पवारांवर साधला निशाणा

इतके दिवस ‘वरिष्ठां’चे ऐकलेत, आता माझे ऐका!

शरद पवारांचे नेतृत्व झुगारल्यानंतर आता अजित पवारांनी लोकसभेसाठी जोरदार तयार सुरू केली आहे. याआधीही शरद पवारांवर त्यांनी टीका केली होती. आता त्यांनी शरद पवारांचे नव्हे तर आपले ऐका अशी हाक आपल्या कार्यकर्त्यांना घातली.

अजित पवारानी सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, आपली शेवटची निवडणूक आहे, असे काही लोक सांगतील. पण तुम्ही भावनिक होऊ नका. अर्थात, शेवटची कधी होणार आहे माहीत नाही. पण भावनिक होऊ नका ही कळकळीची विनंती आहे.

अजित पवार म्हणाले की, आगामी काळात तुम्ही गंभीर समस्येला सामोरे जाल. कुणी म्हणतील वरिष्ठांचं ऐका तर दुसरीकडे कुणी म्हणेल अजित पवार सांगतील तसे करा. पण तुम्ही इतके दिवस वरिष्ठांचे ऐकलेत आता माझे ऐका. यानंतर माझ्या विचारांचा खासदार झाला तर काय होणार आहे? माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत.

अजित पवार यांनी आवाहन केले की, लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे. तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर बारामतीत जो बदल केला आहे, जे काम चाललं आहे, जे निर्णय मी विकासासाठी घेतले आहेत ते लक्षात असू द्या. धाडस दाखवलंत तर ते काम होते हे लक्षात ठेवा.

हे ही वाचा:

२००४ ची चूक पुन्हा नको; लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा मंत्र्यांना इशारा!

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी कायमस्वरुपी निधी देणार

भावनगरमध्ये एकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार

लडाखमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले!

बारामतीत अजित पवार हे पूर्ण ताकद लावत आहेत. या भाषणादरम्यान एक कार्यकर्ता मंचावर आला आणि त्याने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्या अशी मागणी केली. तेव्हा पवारांनी ही अशी आमची बारामती असे उद्गार काढले. बारामतीमध्ये सध्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र अद्याप इथे कुणाला उमेदवारी देणार हे स्पष्ट झालेले नाही. कुठल्या पक्षाला इथे उमेदवारी मिळणार हेदेखील स्पष्ट झालेले नाही.

मात्र तीनवेळा खासदार ठरलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी लोकसभेचा मार्ग आता तेवढा सोपा राहिलेला नाही. अजित पवारच आता महायुतीमध्ये असल्यामुळे सुप्रिया सुळे यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

 

Exit mobile version