महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी येत्या काळात कोणाच्याही मदती शिवाय सत्ताधारी पक्ष होईल असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात सत्ता बदलाचे वारे वाहू लागल्येत का? अशा चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांना भाजपाचे चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचीही पार्श्वभूमी आहे.
रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात मालवणच्या दौऱ्यावर आहेत. एका वैद्यकीय महाविद्यलयाच्या उद्घाटनासाठी शहा यांचा महाराष्ट्र दौरा होणार आहे. पण या दौऱ्याच्या आदल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ भाजपा महाराष्ट्राने ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये फडणवीस मीरा भाईंदरच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना दिसत आहेत. “आपण महाराष्ट्रातला मोठा पक्ष आहोतच पण येत्या काळात आपण कोणाच्याही मदतीशिवाय, कुबड्यांशिवाय स्वतंत्रपणे सत्तापक्ष म्हणून उदयास येऊ.” असे फडणवीसांनी म्हटले आहे. एकीकडे शहा यांचा महाराष्ट्र दौरा ठरलेला असताना त्याच्या आदल्याच दिवशी फडणवीसांचा व्हिडीओ ट्विट झाल्याने महाराष्ट्रातील सत्ता बदलांच्या चर्चांना उधाण आले आहे.
आगामी काळात भारतीय जनता पक्ष कोणाचीही सोबत न घेता सत्ता प्रस्थापित करेल. –@Dev_Fadnavis pic.twitter.com/hPT5l9p6hg
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 6, 2021
विशेष म्हणजे सध्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला अंदाजे सव्वा वर्ष पूर्ण होत आले आहे. या आधी जेव्हा कर्नाटक आणि मध्य प्रदेशात सत्तांतर झाले तेव्हाही त्या दोन्ही सरकारांनी आपला सव्वा वर्षाच्या जवळपासचाच कालखंड पूर्ण केला होता.