ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित करताना पुन्हा खोके, गद्दार आणि टोमण्यांचा पुनरुच्चार केला. सरकारचा जन्म खोक्यातून झाला. गद्दारांना गाडायचं आहे, अशी विधानं उद्धव ठाकरेंनी शानिवारी झालेल्या मेळाव्यात केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ज्या सरकाराचा जन्मच खोक्यातून झाला आहे ते आम्हाला काय सांगतात. ही परीक्षा कठीण आहे, त्यामुळे यामध्ये लढणारे खरे शिवसैनिक आहेत. मी जर काही केलं नसतं तर तुम्ही इथे का आला असता. ते जो काही प्रश्न विचारत आहेत त्याचं उत्तर तुम्हीच देणार आहात,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी देखील मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली पण मी संविधानाच्या आधारावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मी तेव्हा म्हटलं होतं की मी कोणासोबतही भेदभाव करणार नाही. मी काँग्रेससोबत सरळ मार्गाने गेलो, अर्ध्या रात्री बैठका करुन गेलो नाही,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
भाजपाचे म्हणजे असे आहे की, बाहेर असेल तर मळ आणि भाजपत आलं की कमळ. भाजपाला कमळ फुलवायला भ्रष्टाचारीच लागतात का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला, इतिहासातील एकमेव असा दीर्घकाळ टिकलेला भाजपा आणि शिवसेनेचा जोड होता, तो भाजपानेच आधी तोडला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
गडकरी रंगायतनविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “एक सभेत बाळासाहेबांना चिठ्ठी आली; ठाण्यात नाट्यगृह नाही. त्यानंतर आम्ही ठाण्याला नाट्यगृह दिलं. पण सध्या इथे काही वेगळीच नाटकं सुरु आहेत,” असा टोमणा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.
हे ही वाचा:
पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्याच्या साथीदारास रत्नागिरीतून अटक
राज्यात प्रथमच महसूल सप्ताहाचे आयोजन
भारतीय शास्त्रज्ञांकडून हिमालयातील प्राचीन महासागराचा शोध
राज्यात सॅटेलाईट कॅम्पसमुळे स्थानिक पातळीवर रोजगार मिळतील
मणिपूरमध्ये जो हिंसाचार सुरु आहे त्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. राष्ट्रपती महिला असून त्यांचे यावर मौन का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर, दुसरीकडे मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणतात अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. असे बोलताना लाज वाटली पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.