लोकसभेच्या पराभवानंतर भाजपाने केले मायक्रो मॅनेजमेन्ट!

बोरीवली विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संजय उपाध्याय यांची 'न्यूज डंका'वर मुलाखत

लोकसभेच्या पराभवानंतर भाजपाने केले मायक्रो मॅनेजमेन्ट!

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जागा वाटप पार पडले असून आता रॅली आणि प्रचार सभांनी जोर धरला आहे. देशातला आणि राज्यातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाने बोरिवली या हुकमी आणि सुरक्षित मतदार संघाची उमेदवारी भाजपा मुंबईचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना दिली. भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी ‘न्यूज डंका’च्या स्टुडीओला भेट देऊन सविस्तर मुलाखत दिली. ‘न्यूज डंका’चे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये संजय उपाधाय्य यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि महाराष्ट्रातील एकूणच निवडणुकीच्या परिस्थितीवर आपले मत मांडले. याशिवायही त्यांनी अनेक मुद्द्यांवर रोखठोक आणि परखड भाष्य केले.

विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही मनाविरोधात गोष्टी घडल्या यानंतर मानसिकता कशी होती?

पक्षाकडून ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्याचं दिवशी रात्री मी स्वतः भाजपा नेते गोपाळ शेट्टी यांच्या घरी गेलो. गोपाळ शेट्टी हे आमचे नेते असून अनेक वर्षांपासून आम्ही सोबत काम केले आहे. त्यांनी त्याचं दिवशी मला आशीर्वाद दिला. माध्यमांसमोरही हेच म्हणालो की, गोपाळ शेट्टी हे आमचे नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. गोपाळ शेट्टी हे भाजपासोबतच राहणार आणि त्यांच्या नेतृत्वातचं मी निवडणूक लढवणार.

निवडणुकीच्या काळात अनेकदा संजय उपाध्याय यांचे नाव चर्चेत असायचे पण, पुढे काही नाही अशा वेळी निराशा आली का?

मी कधीच तिकीट मागितली नाही. मुळात आमच्या घरी राजकीय पार्श्वभूमी नाही त्यामुळे राजकारणात आल्यावर संघटनेत काम करून मोठे व्हायचे हेच उद्दिष्ट होते. आपल्या कामाने लोकांनी आपल्याला ओळखायला हवे हे लक्ष्य होते. लक्ष्य कठीण असले तरी तेव्हा नेत्यांनी मार्गदर्शन केले आणि काम करत गेलो. युवा मोर्चा मुंबईचा अध्यक्ष झालो. युवा मोर्चाला शक्तिशाली बनवले आणि यश आले. मुंबई अध्यक्ष सोडून भाजपाच्या प्रत्येक पदावर मी काम केले आहे. ही सर्व कामे उत्साहाने केली. कार्यकर्त्यांमध्ये गुंतून पक्षाने दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी प्रयत्न असतात. त्यामुळे ही सर्व कामे करत असताना निवडणूक लढवावी असा विचार कधीचं मनात आला नाही. विचार न करता पक्षाने जवळपास सात वेळा माझ्या नावाचा विचार केला; त्यावेळी असं वाटायचं की माझ्या कामाची दखल कोणीतरी घेत आहे. मी कधीही लॉबिंग केली नाही की कधीही कुठल्याही नेत्याच्या घरी जाऊन बसलो नाही. यावेळीही बोरिवलीमधून मी तिकीट मागितली नव्हती. मी विले पार्लेतून तिकीट मागितली होती पण, जेव्हा पक्षाचा निर्णय झाला तेव्हा तो मान्य करून कामाला सुरुवात केली. मुंबईत भाजपा १७ जागांवर लढत आहे त्याच्यात एक जागा बदलण्यात आली आणि तिथे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यात आली हे फक्त भाजपामध्येचं होऊ शकते.

उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर बोरिवलीच्या विद्यमान आमदारांची प्रतिक्रिया काय होती?

एबी फॉर्म घेऊन मंत्री पीयूष गोयल यांच्या सुचनेनंतर सुनील राणे यांच्या कार्यालयात गेलो होतो. तिथे सुनिल राणे यांनी स्वतः जोरदार स्वागत केले. त्यांना तिकीट मिळाले नाही याचे दुःख असणे स्वाभाविक होते. पण, मोठ्या मनाने त्यांनी स्वागत केले. मित्र पक्षाचे नेते प्रकाश सुर्वेही हजर होते. सकारात्मक वातावरणात माझे स्वागत झाले.

२००९ पासून आतापर्यंत बोरिवलीची जागा कोणा एकाकडे राहत नाही, हे चित्र आहे. हा विचार मनात आला का?

पक्षाने सांगितले की, उद्या जाऊन दुसरीकडे काम करायचे आहे, संघटनेचे काम करायचे आहे तर मी ते सहज स्वीकारीन. आमदारकी ही माझे कधीचं लक्ष्य नव्हते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करता करता भाजपाकडे पावले कशी वळली?

आमच्या घरासमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा होती. माझे वडील स्वयंसेवक आहेत आणि त्यांच्यामुळेच शाखेत गेलो. संघ शिक्षा झाली. कॉलेजमध्ये शिकत असताना निवडणूक लढण्याचा योग आला. कॉलेजमधील निवडणूक जिंकलीही. सुरुवातीला निवडणुकांमध्ये संघाची व्यवस्था असायची. निवडणूक असताना वडिलांसोबत पोलिंग टेबलवर बसायचो. पालिकेच्या निवडणुकीदरम्यान खूप काम केले पण, निवडणूकीत यश आले नाही. तेव्हा लक्षात आले केवळ निवडणुकीच्या वेळी काम करून निवडणूक जिंकता येत नाही तर सतत काम करावे लागेल. त्यावेळीचं युवा मोर्चाचे वार्ड अध्यक्ष म्हणून जबबदारी मिळाली आणि पुढे हा राजकीय प्रवास सुरू झाला.

देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या अखेरच्या टप्प्यात महामंडळाचे अध्यक्षपद दिले, तेव्हाचा अनुभव कसा होता?

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र हाउसिंगचे काम दिले होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याला संधी देण्यात आली. अनेक लोकं, कार्यकर्ते दिवसभर भेटायला येत होते हे प्रेम पाहून काम करण्याची नव्याने ताकद मिळाली.

दिवाळीनंतर प्रचाराची रणनीती कशी असणार आहे?

साधारण १० ते ११ दिवस प्रचार मोहीम असेल. त्यात नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या सभा आहेत. लोकांमध्ये भाजपाबद्दल आदर आहे. लोकं भाजपाशी जोडले गेले आहेत. भाजपाबद्दल आत्मीयता आहे. संघ परिवाराचेही चांगले काम आहे आणि ते पुढील कामाला लागले आहेत. त्यामुळे दहाचं दिवस असले तरी आम्ही लोकांपर्यंत पोहचून प्रचार मोहीम राबवू आणि यशस्वी होऊ.

मुंबईमध्ये भाजपा आणि महायुती ज्या जागा लढतेय त्यावर कितपत यश मिळेल?

लोकसभा निवडणुकीनंतर पक्ष पातळीवर आणि सरकारनेही अनेक मोठे निर्णय घेतले. आम्ही मायक्रो प्लानिंग करायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकले. लोकसभेत का हरलो आणि विधानसभेत काय केलं पाहिजे यावर विचारविनिमय केला. फेक नरेटिव्हला आव्हान देणारी योजना आखली. लाडकी बहिण सारख्या अनेक योजना आम्ही यशस्वीपणे राबवल्या. हरियाणा, जम्मू- काश्मीरमधील निवडणुकांपूर्वी भाजपाचा सुपडा साफ अशी चर्चा होती पण आम्ही त्या राज्यांमध्ये चांगले यश मिळवले. त्यानंतर एक सकारत्मक वातावरण घेऊन आम्ही महाराष्ट्रातील निवडणुकांसमोर जात आहोत. आता सगळेच म्हणत आहेत महायुतीचीचं सत्ता येणार आहे.

‘बटेंगे तो कटेंगे’ या योगी आदित्यनाथ यांच्या विधानावर मत काय? महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा कितपत प्रभाव जाणवतोय?

योगी आदित्यनाथ यांनी या एका ओळीतून केलेलं आवाहन लोकांना जाणवत आहे. नरेंद्र मोदीही म्हणतात ‘एक है तो सेफ है’. लोकं याबद्दल चर्चा करत आहेत. बोरिवलीमध्ये विकासकामे झालेली आहेत. पण, बोरिवलीकर हे रोहिंग्या आणि बांगलादेशींबद्दल चिंतीत आहेत. मी संघाचा स्वयंसेवक आहे. त्यामुळे विकासासोबत हिंदुत्व हेचं माझं ध्येय असणार आहे. बोरिवलीमधील एका इमारतीमधील महिलांनी सांगितले की, काही लोकांमुळे आम्हाला भीती वाटत आहे. त्यामुळे अशा समाजकंटकांच्या विरोधात मी समाजसेवक म्हणून उभा राहणार आणि यात तडजोड नाही.

संजय उपाध्याय आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर बोरिवलीच्या फुटपाथवर रोहिंगे आणि बांगलादेशी दिसणार नाहीत का?

एक सुद्धा दिसणार नाही.

राज्यातील विरोधकांच्या परिस्थितीवर काय टिपण्णी आहे?

१५ दिवस बाकी आहेत. त्यांना मुंगेरीलाल के हसीन सपने बघू द्यात. आमचे प्रयत्न, कष्ट, मेहनत यावरून चित्र स्पष्ट आहे की, महायुतीचे सरकार येणार.

किती फरकाने बोरिवलीची जागा जिंकणार?

कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की, महाराष्ट्रातील सर्वात मोठी लीड ही बोरिवलीकर देतील. त्या दृष्टीने जोमाने कामाला लागलो आहे.

Exit mobile version