जालना येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर राजकारण शिगेला पोहोचले असून महाविकास आघाडीतील पक्षातील नेत्यांची जालन्याकडे आंदोलकांना भेटण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, अशोक चव्हाण, रोहित पवार, अंबादास दानवे, संभाजीराजे आदिंनी जालन्याकडे धाव घेत आंदोलकांची भेट घेतली.
प्रथम राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी अंतरवाली सराटी येथे जात रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जात त्यांनी भाषण केले आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती न केल्यामुळेच ही स्थिती ओढवल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांवर खापर फोडले. उद्धव ठाकरे यांनीही रात्री आंदोलकांची भेट घेतली आणि आपल्या महाविकास आघाडीच्या काळात आंदोलकांवर अन्याय झाला नसल्याचे सांगत मविआ सरकारच्या कारकीर्दीचे कौतुक केले. आमच्यावेळेला आंदोलकांवर लाठीचार्ज झाला नव्हता आणि आम्ही आंदोलन करणाऱ्या तत्कालिन आंदोलकांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारमध्ये असताना आम्ही तुम्हाला भेटत होतो पण आता माणुसकीच्या नात्याने भेटायला आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
आरक्षणाचा मुद्दा ज्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडला त्याच महाविकास आघाडीतील नेते अशोक चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडी आरक्षणाचा हा मुद्दा मार्गी लावेल.
हे ही वाचा:
जालना आंदोलनातून महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचा प्रयत्न
आमदार नरेंद्र मेहताच्या मुलाच्या मोटारीचा सी लिंकवर भीषण अपघात
ऑगस्टमध्ये जीएसटी जमा होण्याचा नवा विक्रम
उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या सीईओ पदाचा दिला राजीनामा
उद्धव ठाकरेंना बोलण्याचा अधिकार नाही
यासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे साठ मोर्चे निघाले. त्यावेळी कुठेही सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले नाही. कुठेही गालबोट लागले नाही. मात्र शुक्रवारी या प्रकरणास गालबोट लागले. मराठा समाज संयमी आहे. मराठा समाजाने नेहमीच्या राज्याला प्रगतीकडे नेले आहे. यामुळे या घटनेची चौकशी केली पाहिजे. तर या घटनेवरून कोणीही राजकारण करून नये, आंदोलक, जखमींना भेटण्यासाठी येणाऱ्यांनी जरूर यावे, पण राजकारण करू नये, असे आवाहनच बावनकुळे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे.
आंदोलनासंदर्भात चौकशी केली गेली पाहिजे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे. पोलिसांनी जी कारवाई केली ती चुकीची असेल तर शासन व्हायला पाहिजे. पण सरकार या प्रश्नासंदर्भात पुढाकार घेत आहे.
४०-४५ वर्षे सरकारमध्ये होते पण त्यांनी काहीही केले नाही. फडणवीस सरकारने मराठी समाजाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात बोलण्यास तोंड आहे का. त्यांना असे बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी अडीच वर्षात सर्वोच्च न्यायालयात नीट बाजू न मांडल्यामुळे तो प्रश्न रखडला.