मुंबई पाठोपाठ दिल्लीतूनही मजूरांचे स्थलांतर

मुंबई पाठोपाठ दिल्लीतूनही मजूरांचे स्थलांतर

Photo Credit ANI

दिल्लीत सोमवारपासून टाळेबंदी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे मागच्या टाळेबंदीच्या अनुभवावरून अनेक मजूरांनी पुन्हा एकदा आपल्या गावाची वाट धरली आहे. त्यामुळे दिल्लीच्या आनंद विहार बस स्थानकावर मजूरांची गर्दी पुन्हा एकदा पहायला मिळाली आहे. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला होता.

यावेळी काही मजूरांनी मात्र अचानक लागू केलेल्या टाळेबंदीच्या विरोधात मत व्यक्त केले होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी किमान थोडा अवधी द्यायला हवा होता असे काहींचे मत होते. त्याबरोबरच आनंद विहारपासून घरी जाण्यासाठी पुर्वी बससाठी केवळ ₹२०० तिकिट लागत असे, आता तिथे ₹३००० ते ₹४००० घेत आहेत, मग आता आम्ही घरी कसे जाणार असा सवाल देखील काही लोकांकडून विचारला जात आहे.

हे ही वाचा:

युवकांच्या लसीकरणावरून श्रेय लाटण्याचे प्रयत्न

शिंगणेंच्या खुलाशाने नवाब मलिक यांचा खोटारडेपणा उघड

नावात ‘ऑक्सिजन’ असल्याचा असाही फायदा

दादरचे भाजी मार्केट बंद होणार?

यापूर्वीच महाराष्ट्रात देखील कडक निर्बंधांमुळे अनेक मजूरांनी मुंबई सोडायला सुरूवात केली आहे. त्यामुळे मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनलवर देखील अशाच प्रकारची गर्दी मागचे काही दिवस अनुभवायला मिळाली होती.

सोमवारी रात्री १० वाजल्यापासून पुढच्या सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत म्हणजेच (२६ एप्रिलपर्यंत) हा लॉकडाऊन लागू असेल. या नियमांअंतर्गत अत्यावश्यक सेवा, अन्नपुरवठा, वैद्यकिय सेवा सुरुच राहणार आहेत. तर, लग्नसोहळ्यांमध्ये ५० उपस्थितांचा आकडा बंधनकारक असेल, अशी माहिती शासनातर्फे देण्यात आली.

पुढील सहा दिवसांमध्ये लॉकडाऊन काळात, दिल्लीमध्ये बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे, असं म्हणत केजरीवाल यांनी आपल्याला केलेल्या सहकार्यासाठी केंद्राचे आभारही मानले. लॉकडाऊनच्या या काळात निर्बंध लागू असताना ऑक्सिजन, औषधं अशा सुविधा मार्गी लावण्यासाठीची पावलं उचलण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय त्यांनी नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं.

रविवारी दिल्लीमध्ये कोविडचे सर्वाधिक म्हणजेच, २५,४६२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. या भागात संसर्गाचं प्रमाण वाढीस लागलं असून, त्याची सरासरी २९.७४ वर पोहोचली आहे. याचाच अर्थ असा, की चाचणीचा दर तिसरा नमुना पॉझिटीव्ह असल्याचं आढळून येत आहे. मागील २४ तासांत दिल्लीमध्ये १६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

Exit mobile version