लोकसभेत मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याला अनुमोदन देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर आता राज्यसभेतही हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. संसदेने शुक्रवारी पहाटे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीची पुष्टी करणारा वैधानिक ठराव मंजूर केला. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत दोन महिन्यांच्या आत राष्ट्रपती राजवटीची पुष्टी करण्याचा वैधानिक ठराव चर्चेसाठी आणि मंजूर करण्यासाठी सादर केला.
शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सभागृहाने आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर केला. लोकसभेने यापूर्वीच हा ठराव मंजूर केला होता. अमित शाह यांनी सभागृहात सांगितले की, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर राज्यपालांनी आमदारांशी चर्चा केली आणि बहुसंख्य सदस्यांनी सांगितले की ते सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नाहीत. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, यानंतर मंत्रिमंडळाने राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली जी राष्ट्रपती महोदयांनी मान्य केली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दोन महिन्यांत सभागृहाच्या मंजुरीसाठी यासंदर्भात वैधानिक ठराव आणला आहे.
अमित शाह पुढे म्हणाले की, सरकारची प्राथमिकता ही मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे आहे आणि गेल्या चार महिन्यांत एकही मृत्यू झाला नाही आणि फक्त दोन जण जखमी झाले आहेत. मणिपूरमधील परिस्थिती बिघडण्यामागे न्यायालयाच्या निर्णयाचे मुख्य कारण गृहमंत्र्यांनी नमूद केले. न्यायालयाच्या या निर्णयाला दुसऱ्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचेही ते म्हणाले. मणिपूरमध्ये लवकरच शांतता असावी, पुनर्वसन व्हावे आणि लोकांच्या जखमा भरल्या जाव्यात, अशी सरकारची इच्छा असल्याचे ते म्हणाले. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले.
ठाकरे गटाने लोकसभेत राष्ट्रपती राजवटीचे समर्थन केले. तर, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांचे कौतुकही केले. त्या म्हणाल्या की, आम्हाला गृहमंत्र्यांकडून जास्त अपेक्षा आहेत. अमित शाह हे खंबीर गृहमंत्री आहे. त्यांनी काश्मीरमध्ये चांगले निकाल दिले आहेत. पण, मणिपूरवर आम्ही समाधानी नाही. सरकार एक देश एक निवडणुकीवर चर्चा करत आहे. पण राष्ट्रपती राजवट लावावी लागते हे सशक्त लोकशाहीसाठी चांगले नाही. अमित शाह खंबीर असून त्यांच्याकडून आशा आहे की मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करतील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
हे ही वाचा:
Chaitra Navratri: आज चैत्र नवरात्राचा सातवा दिवस, ही कथा नक्की वाचा
Viral Video: ‘अत्याचार’: ‘साहेब, मला वाचवा…’,
रस्त्यांची कामं फास्ट ट्रॅकवर पूर्ण करा, नागरिकांची त्रासातून सुटका करा!
विधेयकाला ‘उम्मीद’ नाव दिले; पण काही ‘उम्माह’चे स्वप्न पाहत होते!
केंद्र सरकारने १३ फेब्रुवारी रोजी मणिपूरमध्ये संविधानाच्या कलम ३५६ अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू केली होती. मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या राजीनाम्याच्या चार दिवसांनंतर हे करण्यात आले. कलम ३५६ नुसार, राष्ट्रपती राजवटीची घोषणा दोन महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केली पाहिजे.