सन १९७७ मध्ये आणिबाणीनंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर देशाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा तमिळनाडूचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी केला आहे. ‘आणीबाणीदरम्यान सगळीकडे दमनशाही होती. सन १९७५ ते १९७७ पर्यंत २१ महिन्यांत १.१४ लाख लोकांना अटक करण्यात आली होती,’ असे त्यांनी सांगितले. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांनी संपूर्ण तमिळनाडूत कार्यक्रम आयोजित केले आहेत.
चेन्नईतील भाजप मुख्यालयाच्या कार्यक्रमात अण्णामलाई यांनी याबाबत भाष्य केले. ‘आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर इंदिरा गांधी यांनी विचार केला की, देशाची जनता संपूर्ण गांधी कुटुंबाला मारहाण करेल. यासाठी त्यांनी त्यांचा मुलगा राजीव गांधी यांना देशाबाहेर जाण्यासाठी मुंबईमध्ये त्यांच्यासाठी एक विशेष विमान सज्ज ठेवण्यास सांगितले होते. मात्र, १९७८ मध्ये सत्ता मिळाल्यानंतर माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आश्वासन दिले होते की, जनता त्यांना माफ करेल आणि त्यांना कोणताही धोका नसेल,’ असे अण्णामलाई यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या असदुद्दीन ओवेसींची खासदारकी रद्द करण्याची मागणी
रेल्वेसंबंधी व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणारे
पवार, ठाकरे, जरांगेंचे गलिच्छ राजकारण चालू देणार नाही!
गावबंदीची उठाठेव कशाला? ओबीसींचे आंदोलन ‘जरांगे’ मार्गाने जायला नको…
त्यावर तमिळनाडूचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. सेल्वापेरुन्थगई यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘आणीबाणीमुळे अनेक लाभही झाले. जमीनदारी प्रथा आणि बंधक मजदुरी प्रथेचे निर्मूलन झाले. ते याबाबत बोलणार नाहीत. या घटनेनंतर सर्वसामान्य लोकांसाठी बँकेचे दरवाजे खुले झाले. काही उणिवा असू शकतात. मात्र इंदिरा गांधी या सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा शूर होत्या. लोकांना झालेल्या अडचणींबाबत त्या उघडपणे सार्वजनिकरीत्या माफी मागत. यासाठी त्यांना आयर्न लेडी म्हटले जात होते,’ असे ते म्हणाले. आता देशात १० वर्षांपासून अघोषित आणीबाणी आहे, असाही आरोप त्यांनी केला.