अफगाणिस्तानमध्ये संपूर्ण देशाचे बजेट पाहणाऱ्या अर्थमंत्र्यांवर आता टॅक्सी चालवण्याची वेळ आली आहे. खालिद पायेंदा हे अफगाणिस्तानमधील सत्तापालटापूर्वी अर्थमंत्री होते. गेल्या वर्षी, तालिबानने देशाचा ताबा घेण्यापूर्वी पायेंदा अफगाणिस्तानातून अमेरिकेत पळून गेले होते. सध्या ते अमेरिकेत उबर टॅक्सी चालवत आहेत.
‘वॉशिंग्टन पोस्ट’ने वृत्तानुसार, खालिद पायेंदा म्हणाले की, “या कामामुळे त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. याबद्दल मला खूप कृतज्ञ वाटते. म्हणजे मला हताश होण्याची गरज नाही.” उबेरमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करण्याव्यतिरिक्त पायेंदा आता जॉर्जटाउन विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम करतात. मात्र, कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही काम करतात. पत्नी चार मुले अशा कुटुंबाची काळजी घेण्यासाठी त्यांना हे काम करावे लागत आहे. तरीही अमेरिकेतही त्यांचे भवितव्य अनिश्चित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर पुन्हा अफगाणिस्तानमध्ये परतण्याचा विचारही करू शकत नसल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा:
… म्हणून इम्रान खान यांनी केलं भारताचं कौतुक
लक्ष सेन स्पर्धा हरला, पण मने जिंकून गेला
‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, मात्र लाभ घेते पवार सरकार’
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्याच्या आठवडाभर आधी पायेंदा यांनी देशाच्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. गेल्या वर्षी १० ऑगस्ट रोजी त्यांनी त्यांच्या राजीनाम्याबद्दल ट्विट केले होते. २०२१ च्या ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केली होती. सत्ता स्थापनेनंतर तालिबान सरकारने महिला, मुलींवर अनेक निर्बंध लादले होते. दरम्यान हा देश महागाई, बेरोजगारी आदी समस्यांनाही तोंड देत होता.