एकीकडे टीका तर दुसरीकडे मुखपत्रात जाहिरातबाजी

शिंदे फडणवीस सरकार कसे बेकायदेशीर आहे, असं वारंवार ठाकरे गटाकडून सांगितले जाते.

एकीकडे टीका तर दुसरीकडे मुखपत्रात जाहिरातबाजी

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर ठाकरे गट खोके सरकार म्हणून सातत्याने टीका करत असते. हे सरकार कसे बेकायदेशीर आहे, असं वारंवार ठाकरे गटाकडून सांगितले जाते. मात्र, दुसरीकडे शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मध्ये चक्क पहिल्या पानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहिरात आली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो सामनाच्या पहिल्याच पानावर झळकला आहे. त्यावरून सकाळपासूनच चर्चेला उधाण आले आहे.

सामनाच्या पहिल्या पानावर जाहिरात छापून आली आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्ष… एका वर्षात ७५ हजार रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प. पहिल्या टप्प्यातील नियुक्ती प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम, असा या जाहिरातीवर मजकूर लिहिण्यात आला आहे. शिवसेनेच्या बंडानंतर पहिल्यांदाच शिंदे फडणवीस सरकारची जाहिरात सामनात छापून आली आहे. त्यामुळे ठाकरे गटावर टीका केली जातं आहे.

हे ही वाचा:

सरनाईकांचे प्रताप; आता सहन करावा लागणार नवा मनस्ताप

भारताने बांगलादेशला नमवले आणि पाकिस्तानची केली कोंडी

नाशिकमध्ये देशातील पहिली खासगी बाजार समिती

घरी बसून महाराष्ट्र पिंजून काढतायत उद्धव ठाकरे….

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी या जाहिरातींवरून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. खोके सामनामध्ये पोहोचले का?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विट करून केला आहे. अखेर सामनाचं खरं स्वरूप लोकांसमोर आले. आदित्य ठाकरे रोज सांगतात हे सरकार कसं बेकायदेशीर आहे. मग या बेकायदेशीर सरकारची अधिकृत जाहिरात सामनात कशी? तत्व बाजूला ठेऊन फक्त पैसे गोळा करणे हेच या जाहिरातीतून सिद्ध होतं, अशी सडकून टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

Exit mobile version