लसीकरण केंद्रातील रांगांवर जालीम डोस कोणता?

लसीकरण केंद्रातील रांगांवर जालीम डोस कोणता?

महाराष्ट्रात लसीकरण केंद्रांवर आता लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. समन्वयाचा अभाव हे यामागील कारण आहे. अनेक केंद्रे ही लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे बंद आहेत तर काही केंद्रे सुरू आहेत. लोकांची मात्र प्रचंड परवड या सगळ्या अव्यवस्थेमुळे होत आहे. सकाळपासून लोक लसीकरण केंद्राजवळ रांगा लावून आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यांची नोंदणी केली जाते आहे का, नोंदणी केलेलेच लोक तिथे येत आहेत का? हे स्पष्ट होत नाही. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, संचारबंदी, जमावबंदीचे नियम कडक करण्यात आले आहेत मात्र लसीकरण केंद्रांवर लोकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. त्यातून करोनाला आणखी बळ मिळेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

चाचण्या वाढवा, आकडा लपवू नका- देवेंद्र फडणवीस

नागपूरला पुन्हा तुकाराम मुंढेंची गरज

आयपीएस रश्मी शुक्ला यांनी सीबीआयकडे केले अनेक गौप्यस्फोट?

आता ठाकरे सरकारने मरण्याची वेळही निश्चित करावी

अनेक लोक लसीकरण केंद्रावर पोहोचल्यानंतर तिथे लस संपलेली आहे, असे नोटीसबोर्ड वाचावे लागतात किंवा माहिती मिळते. लसींचा पुरवठा थांबला आहे हे कारण पुढे केले जाते. पण हा पुरवठा कधी थांबणार, कधी सुरू होणार याचा अंदाज यासंदर्भातील व्यवस्थापन पाहणाऱ्यांना नसतो का? मग लसीकरणासाठी लोकांना बोलावण्याआधी त्यांना ही माहिती का दिली जात नाही? लसीकरण केंद्रावर किती लस उपलब्ध होत आहे, किती दिवस पुरणार आहे, किती लोकांना देता येणार आहे, हे लक्षात घेऊन लोकांना तिथे बोलावणे आणि त्यांना लस देणे हे करता येऊ शकते. जशी लस उपलब्ध होईल तशी लस देणे हेच हाती आहे. मग लशी संपल्यानंतरही लोक लसीकरण केंद्रावर गोळा कसे होतात? लोकांच्या होणाऱ्या या परवडीकडे सहानुभूतीपूर्वक पाहिले जात नाही का? लोक लसीकरण केंद्रावर गर्दी करतात आणि नंतर लसीकरण होणार नाही, लशी संपल्या आहेत असे लोकांना कळविले जाते. त्यावेळी चरफडत तिथून निघून जाण्याशिवाय लोकांना कोणताही मार्ग उरत नाही. या रांगेत असलेले बहुतांश लोक हे ४५ वयापेक्षा अधिक वय असलेले आहेत. या सगळ्या वयोवृद्ध लोकांना रांगेत तासनतास उभे राहावे लागते किंवा तिथे व्यवस्था केलेल्या खुर्च्यांवर बसून राहावे लागते. त्यांच्या खानपानाची व्यवस्थाही नसते. परिणामी, लोकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतो. अनेक जण आपल्या नोकरी किंवा कामातून सुट्टी घेऊन किंवा घरातील कामकाज सोडून लसीकरणासाठी प्रतीक्षायादीत असतात. मात्र त्यांना नीट माहिती मिळत नाही.
एखादे अॅप तयार करून किंवा त्यांना मेसेज पाठवून कधी लस मिळणार, कोणत्या वेळेला मिळणार याची माहिती दिली जायला हवी. अन्यथा, लस मिळणार म्हणून लोक गर्दी करतात, त्यातील कुणाला कोणत्या वेळेला लस मिळेल हे कळलेलेच नसते. त्यामुळे लोक दिवसभर उभे राहतात आणि लस मिळत नाही किंवा विलंबाने मिळते. लोकांना होणारा हा त्रास कधी संपणार आहे?
आता तर १८ ते ४४ वयोगटादरम्यानच्या लोकांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ५ कोटी ७१ लाख लोकांना लस देण्यात येणार आहे. पण हा निर्णय घेतल्यानंतर आधी सुरू असलेला गोंधळ मात्र टाळता आला पाहिजे. आधीच ४५ वयापेक्षा अधिक वयातील लोकांना लस देताना समन्वयाअभावी गोंधळ उडताना दिसतो. त्यामुळे आता १ मेपासून १८ वयापेक्षा अधिक लोकांना लस देताना आणखी काळजी घ्यावी लागेल. नाहीतर या गोंधळात नव्या गोंधळाची भर पडेल.

Exit mobile version